ब्रँड असली, माल नकली! ब्युटी पार्लरमध्ये जाताना घ्या काळजी!!

मुंबईकरांनो, यापुढे ब्युटी पार्लरची पायरी चढताना जरा सावधान! कारण जी सौंदर्य प्रसाधने तुमच्या चेहऱ्यावर, त्वचेवर लावली जात आहेत ती बनावट असू शकतात. हो, अशा बनावट सौंदर्य प्रसाधनांमुळे तुमच्या त्वचेवर दुष्परिणाम होऊन तुम्हाला त्वचेचा कर्करोगही होऊ शकतो. त्यामुळे सौंदर्य प्रसाधने बनावट नाहीत, याचीही खात्री करून घ्या, असं आवाहन अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्त डाॅ. पल्लवी दराडे यांनी 'मुंबई लाइव्ह'च्या माध्यमातून केलं आहे.

ब्रँड असली, माल नकली! ब्युटी पार्लरमध्ये जाताना घ्या काळजी!!
SHARES

सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी सध्या प्रत्येक मेट्रोसेक्शुअल तरूण, तरूणी ब्युटी पार्लरचा रस्ता धरतात. निरनिराळ्या सौंदर्य प्रसाधनांचा यथेच्छ वापर करून मोठ्या रुबाबात बाहेर पडतात. पण मुंबईकरांनो, यापुढे ब्युटी पार्लरची पायरी चढताना जरा सावधान! कारण जी सौंदर्य प्रसाधने तुमच्या चेहऱ्यावर, त्वचेवर लावली जात आहेत ती बनावट असू शकतात. हो, अशा बनावट सौंदर्य प्रसाधनांमुळे तुमच्या त्वचेवर दुष्परिणाम होऊन तुम्हाला त्वचेचा कर्करोगही होऊ शकतो. त्यामुळे सौंदर्य प्रसाधने बनावट नाहीत, याचीही खात्री करून घ्या, असं आवाहन अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्त डाॅ. पल्लवी दराडे यांनी 'मुंबई लाइव्ह'च्या माध्यमातून केलं आहे. बनावट सौंदर्य प्रसाधने तयार करणाऱ्यांसह ती विकणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी लवकरच कडक उपाययोजना केल्या जाणार असल्याचंही डाॅ. दराडे यांनी स्पष्ट केलं.


राज्यभर छापे

एफडीएकडे बनावट सौंदर्य प्रसाधनाच्या अनेक तक्रारी आल्यानंतर महिन्याभरापासून मुंबईसह राज्यभर एफडीएने छापे टाकले असता एक धक्कादायक बाब समोर आली. ती म्हणजे बहुतांश ब्युटी पार्लरमध्ये ब्रँडेड सौंदर्य प्रसाधनांच्या बाटल्यांमध्ये बनावट सौंदर्य प्रसाधने भरून ती सर्रासपणे वापरली जात आहेत.


४९ लाखांचं बनावट सौंदर्य प्रसाधन

शॅम्पू, हेयर कलर, फेस वाॅश, फेस मसाज क्रिमसह अन्य उत्पादने बनावट असल्याचं आढळून आलं आहे. त्यानुसार मुंबईतील धारावी आणि विर्लेपार्ले परिसरातून २६ लाख रुपयांचा, पुण्यातून ७ लाखांचा तर नागपूरमधून १६ लाखांचा असा एकूण ४९ लाखांचा बनावट सौंदर्य प्रसाधनांचा साठा महिन्याभरात जप्त करण्यात आल्याचं दराडे यांनी सांगितलं



कुठे तयार होतात?

झोपडपट्ट्यामध्ये बनावट सौंदर्य प्रसाधने तयार केली जात असून ही बनावट सौंदर्य प्रसाधने बँडेंड सौंदर्य प्रसाधनांच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये भरली जात असल्याचं यावेळी उघड झालं आहे. त्यामुळे आता सौंदर्य प्रसाधानाच्या उत्पादनासह विक्रीचे नियम अत्यंत कडक करण्याचा निर्णय एफडीएने घेतला आहे.


विक्रीसाठीही नोंदणी

सद्यस्थितीत सौंदर्य प्रसाधनांच्या उत्पादनासाठी एफडीएची नोंदणी आणि परवान्याची गरज लागते. पण आता यापुढे सौंदर्य प्रसाधनाच्या विक्रीसाठीही नोंदणी-परवाना बंधनकारक करण्यात येणार आहे. त्यानुसार लवकरच यासंबंधीचं परिपत्रक जारी करण्यात येणार असल्याची माहिती डाॅ. दराडे यांनी दिली.



सामानाची विल्हेवाट लावणं बंधनकारक

त्याचवेळी सौंदर्य प्रसाधनांच्या बाटल्यांचं योग्य ती विल्हेवाट ब्युटी पार्लर चालवणाऱ्यांकडून लावली जात नाही. त्यामुळे बाटल्यांचा पुनर्वापर बनावट सौंदर्य प्रसाधन बनवणाऱ्यांकडून होत असल्याचंही या कारवाईतून समोर आलं आहे. या गोष्टीला आळा घालण्यासाठी आता ब्युटी पार्लर चालवण्यासाठी बाटल्या आणि इतर कंटेनरची योग्य ती विल्हेवाट लावणेही बंधनकारक करण्यात येणार आहे. बाटल्या-कंटेरनची विल्हेवाट लावली जातेय की नाही यावर एफडीएचा वाॅचही असणार आहे.


आपलीही जबाबदारी

एफडीएने बनावट सौंदर्य प्रसाधनांचा काळाबाजार रोखण्यासाठी पाऊल उचलण्यास सुरूवात केली आहे. पण ब्युटी पार्लरमध्ये जाणाऱ्या प्रत्येकाचीही आता जबाबदारी वाढली आहे. त्यानुसार आपल्या त्वचेसाठी ज्या सौंदर्य प्रसाधनाचा वापर केला जात आहे ते चांगल्या दर्जाचे आहे का? ते बनावट तर नाही ना? हे तपासण्याची. त्यामुळे ही काळजी आता घ्याच.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा