भीमा कोरेगाव हिंसाचार, राज्यभरात दंगलीचे १२० गुन्हे दाखल


भीमा कोरेगाव हिंसाचार, राज्यभरात दंगलीचे १२० गुन्हे दाखल
SHARES

भीमा-कोरेगाव प्रकरणाचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले. यादरम्यान तरुणांनी विविध जिल्ह्यांमध्ये कायदा हातात घेत दंगलसदृश परिस्थिती घडवली. यामुळे सरकारी आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं. आता या आंदोलनाला हिसंक वळण देणाऱ्यांविरोधात पोलिसांनी राज्यभरात सुमारे १२० दंगलीचे गुन्हे दाखल केले आहेत. त्यातील २५ गुन्हे मुंबईत दाखल करण्यात आले आहेत. राज्यभर तोडफोड आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांमुळे सुमारे ९० पोलीस जखमी झाल्याची माहिती पोलीस मुख्यालयातून देण्यात आली आहे.


२५ आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल, ३७ जणांना अटक

बुधवारी ३ जानेवारी रोजी महाराष्ट्र बंदच्या वेळी विविध ठिकाणी रस्त्यावर उतरलेल्या शेकडो आंदोलकांनी तोडफोड करत सरकारी मालमत्तेचं नुकसान केले. तर काहींनी पोलिसांवर देखील हल्ला केला. त्यामुळे शहरात कायदा आणइ सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची धरपकड सुरू केली. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत विविध पोलीस ठाण्यांत २५ आंदोलनकर्त्यांवर गुन्हे नोंदवले असून ३७ जणांना अटक केली आहे. तर २५० हून अधिक जणांना ताब्यात घेतलं आहे. याचसोबत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या सहाय्याने फरार आंदोलकांवर गुन्हा नोंदवणार आहे.


१५ ते १६ अल्पवयीन मुलं पोलिसांच्या ताब्यात

मुंबईतील चेंबूर, पवई, गोवंडी या ठिकाणी आंदोलकांनी वाहनांची तोडफोड करत गस्तीवर असलेल्या पोलिसांवर देखील दगडफेक केली. गोंवडीच्या आनंदनगर, निलम जंक्शन, अशोक नगर, सावली नाका या ठिकाणी करण्यात आलेल्या दगडफेकीत गोवंडी पोलीस ठाण्याचे १५ अधिकारी गंभीर जखमी झाले. तर प्रतिक्षानगर, वरळी नाका, पवई, सांताक्रूझच्या मोतीलाल नगर आणि इतर ठिकाणी अशा ५२ बसेसची तोडफोड करण्यात आली आहे. या मध्ये ४ चालक गंभीर जखमी झाले. यावेळी पोलिसांनी १५ ते १६ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं.


दंगेखोरांची ध्वनीफीत, चित्रफीत पोलिसांच्या हाती

राज्यभरात दंगेखोरांनी केलेल्या उपद्रवाच्या डझनभर चित्रफीती आणि ध्वनीफिती पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. त्यांच्या सहाय्याने संबंधीत व्यक्तींवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी दिली.


या आंदोलनामुळे राज्यातभरातील नुकसानीचा आढावा

  • बेस्टचे १९ कोटींचं नुकसान
  • पश्चिम रेल्वेचे ५ हजार कोटीचं नुकसान
  • एमएसआरटीसीचं १ कोटीचं नुकसान
  • मध्य रेल्वेचं १५ लाखांचं नुकसान
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा