केईएममधील त्या दुर्घटने प्रकरणी भोईवाडा पोलिसात गुन्हा दाखल

दुर्घटनेत प्रिन्सचा हात आणि एका बाजूचा चेहरा भाजला आहे. त्याच हाताला संसर्ग झाल्यामुळे रक्ताभिसरणाला अडथळे निर्माण होऊ लागल्यामुळे त्याचा हात काढण्याचा निर्णय घेण्यात आला

SHARE

केईएम हॉस्पिटलमध्ये व्हेंटीलेटरवर उपचार घेत असलेला प्रिन्स राजभर अचानक भाजला. त्यामुळे त्याच्या हातावर शस्त्रक्रिया करुन हात काढून टाकावा लागला. या प्रकरणी दुर्घटना घडलेल्या ठिकाणचे जबाबदार अधिकारी आणि व्हेंटीलेटर मशीनची देखभाल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर भोईवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाची रुग्णालय प्रशासनाकडून ही चौकशी सुरू आहे.

उत्तर प्रदेश राज्यातील महू जिल्ह्यातून अडीच महिन्यांच्या प्रिंसला घेऊन त्याचे वडील मुंबईत दाखल झाले होते. त्याच्या हृद्यात असणाऱ्या छिद्रावर उपचार करण्यासाठी त्यांनी केईएम हॉस्पिटल गाठले. उपचार सुरू झाल्यानंतर त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. पण, व्हेंटीलेटरवर असलेला प्रिन्स शॉर्टसर्किटच्या फ्रिक फायरने भाजला. या दुर्घटनेत प्रिन्सचा हात आणि एका बाजूचा चेहरा भाजला आहे. त्याच हाताला संसर्ग झाल्यामुळे रक्ताभिसरणाला अडथळे निर्माण होऊ लागल्यामुळे त्याचा हात काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, त्याचा हात शस्त्रक्रिया करुन सोमवारी काढण्यात आला. त्यामुळे, या दुर्घटनेच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. रमेश भारमल यांनी दिली.

रुग्णालय प्रशासनाच्या या निष्काळजी प्रकरणी मुलाचे वडिल पन्नीलाल रामजी  राजभर यांनी या दुर्घटनेस कारणीभूत असलेल्यांविरोधात भोईवाडा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.  त्यानुसार भोईवाडा पोलिसांनी रुग्णालयाच्या माॅनिटरचे व विद्युत उपकरणांची देखभाल करणारे जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांचे निष्काळजी प्रकरणी भा.द.वि कलम 338 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी भोईवाडा पोलिस अधिक तपास करत आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या