संपत्तीसाठी सख्ख्या भावालाच ठरवलं मृत


संपत्तीसाठी सख्ख्या भावालाच ठरवलं मृत
SHARES

वडाळा - जिवंत व्यक्तीला मृत घोषित करून त्याची संपत्ती हडपण्याचा प्रकार वडाळ्यातल्या कमलानगरमध्ये उघडकीस आलाय. या प्रकरणी सुधाकर कोमल यादव, कोमल सुखनंदन यादव, मुन्नीबाई झगडूराम मौर्य (दलाल), धनराज अंकुश कांबळे (दलाल) यांना वडाळा टीटी पोलिसांनी अटक केली आहे.

वडाळ्याच्या भारतीय कमलानगरमध्ये राहणारे पीडित दाम्पत्य एचआयव्हीग्रस्त आहेत. ते उपचारासाठी नेहमीच उत्तर प्रदेशात जातात. त्याप्रमाणे यंदाही ते उपचारासाठी जात असताना चोरट्यांच्या भीतीने त्यांनी घराची कागदपत्रे (शिधावाटप पत्रिका, पॅन कार्ड, विद्युत बिल, खोलीचे पेपर, पासबुक, जीवन विम्याचे पेपर) सख्खा भाऊ कोमल यादव आणि त्याची पत्नी रामदुलारी यादव यांच्याकडे दिले होते.

दरम्यान, कोमल यादव आणि रामदुलारी यांनी पीडित दाम्पत्याची संपत्ती हडप करण्याचा बेत आखला. यामध्ये मुलगा सुधाकरच्या मदतीने त्यांनी परिसरातील रमेश नरसई वेम्प्टी नावाच्या व्यक्तीच्या मृत्यूचा दाखला मिळवला. त्यानंतर माटुंग्याच्या शिधावाटप कार्यालयात जाऊन दलालामार्फत मृत रमेश वेम्प्टीच्या नावावर खाडाखोड करून पीडित व्यक्तीचं नाव टाकलं आणि दलालाच्या मदतीने जिवंत भावाला मृत घोषित करून शिधापत्रिका आपल्या नावावर करून घेतली.

काही दिवसांनी घरी परतलेल्या पीडित दाम्पत्यानी ठेवायला दिलेल्या शिधापत्रिकेची मागणी करताच रामदुलारी आणि कोमल यादव यांनी पीडित दाम्पत्याला जबर मारहाणही केली. त्यावेळी घाबरलेल्या यादव दाम्पत्यांनी तात्काळ वडाळा टीटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणाची चौकशी करून चौघांना ताब्यात घेतल्यानंतर गुन्ह्याचा पर्दाफाश झाला. याबाबत अधिक तपास सुरू असून या घटनेशी संबंधित असलेल्या सर्वांना लवकरच ताब्यात घेणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा