बाईकचोर सापडला सीसीटीव्हीच्या जाळ्यात!

Mira Bhayandar, Mumbai  -  

भाईंदरच्या नवघर पोलिसांनी एका अशा सराईत बाईक चोराला अटक केली आहे, जो सोसायटीत पार्क केलेली बाईक अत्यंत चलाखीने चोरुन नेहमी फरार होत असे. यावेळी देखील त्याने अशाच प्रकारे चोरी केली. पण त्याने केलेली ही चोरी सीसीटीव्हीत कैद झाली. पोलिसांनी अवघ्या काही तासांतच त्याच्या मुसक्या आवळून त्याने चोरलेली बाईक जप्त केली आहे. पोलिसांच्या तावडीत असलेल्या या आरोपीचे नाव अजित हुसेन सय्यद आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तो मालाडच्या मालवणीमधील राहणारा असून तो एसी दुरुस्तीचे काम करतो. मेहनत करून देखील घरचा खर्च भागत नसल्याने त्याने चोरीचा मार्ग अवलंबला. अशा प्रकारे त्याने अनेक बाईक चोरी केल्या. पण यावेळी मात्र, त्याने केलेली चोरी सीसीटीव्हीत कैद झाली. 9 जून रोजी तिरुपती वाटिका सोसायटीत पार्क केलेली स्कूटी तो चोरी करत होता. तेव्हा त्याच्या या प्रत्येक हरकतीवर सीसीटीव्हीची नजर होती. याच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर पोलिसांना त्याला अटक करण्यात यश आले. त्याने अशा प्रकारे आणखी किती दुचाकी चोरल्या याचा देखील सध्या पोलिस तपास सुरू असल्याचे नवघर पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी चंद्रकांत नाईक यांनी सांगितले.

Loading Comments