भाजपचा “तो” पदाधिकारी बांगलादेशीच; तपासात आलं सत्य समोर

रुबेल जोनू शेख याला अटक करण्यात आली असून चौकशीत तो बांगलादेशी असल्याचे अनेक पुरावे पोलिसांच्या हाती आले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

भाजपचा “तो” पदाधिकारी बांगलादेशीच; तपासात आलं सत्य समोर
SHARES

भारतीय जनता पक्षाचा उत्तर मुंबई अल्पसंख्याक विभागाचा अध्यक्ष रुबेल जोनू शेख हा बांगलादेशी असून, त्याने खोट्या कागदपत्रांच्या आधारे भारतीय नागरिकत्व घेतल्याची तक्रार पात्र झाली होती. त्या तक्रारीच्या आधारावर या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. रुबेल जोनू शेख याला अटक करण्यात आली असून चौकशीत तो बांगलादेशी असल्याचे अनेक पुरावे पोलिसांच्या हाती आले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) यांनी दिली.

रुबेल जोनू शेख हा बांगलादेशी असून त्याने खोट्या कागदपत्रांच्या आधारे भारतीय नागरिकत्व मिळविलं असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली होती. रुबेल हा भाजपचा पदाधिकारी असून या पक्षाने कोणतीही शहानिशा न करता त्याला पद कसं दिलं. बेकायदेशीररित्या घुसखोरी करून मुंबईमध्ये राहणाऱ्या अशा भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी काही समाज विघातक कार्य केल्यास त्याची जबाबदारी भाजप (bjp) घेणार का? असा प्रश्नसुद्धा महेश तपासे यांनी उपस्थित केला होता. तसंच ही बाब गंभीर स्वरुपाची असल्याने याची चौकशी करण्याबाबतचे निवेदन व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे गृहमंत्री अनिल देशमुख यांना देण्यात आलं होतं.

हेही वाचा- शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडवणाऱ्यांवर कारवाई

या संदर्भात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते. पोलिसांनी याचा तपास केला असता चौकशीदरम्यान त्यांच्या घरात प. बंगाल राज्यातील मलापोटा ग्रामपंचायत, जिल्हा – २४ उत्तर परगणा येथील ग्रामपंचायत रहिवाशी दाखला तसंच बोलगंडा आदर्श हायस्कूल जिल्हा – नादिया येथील शाळा सोडल्याचा दाखला मिळाला होता. पोलिसांनी मलापोटा ग्रामपंचायतमध्ये जाऊन चौकशी केली असता रुबेल जोनू शेख याचा नावाचा कोणताही रहिवाशी दाखला देण्यात आलेला नाही, अशी माहिती समोर आली.

तसंच जिल्हाधिकारी कार्यालय, नादिया प. बंगाल येथील रेकॉर्ड तपासून पाहिलं असता रुबेलकडे असलेला दाखला हा दुसऱ्याच कोणाच्या तरी नावावर असलेल्याचं समोर आलं. यानंतर पोलिसांनी रुबेलच्या घरात सापडलेला शाळा सोडल्याबाबतच्या दाखल्याचे जिल्हा शाळा निरीक्षक ए.स. जि. नादिया, राज्य प.बंगाल येथील रेकॉर्ड तपासून पाहिले असता सदर दाखल्यामध्ये नमूद करण्यात आलेली बोलगंडा आदर्श हायस्कूल, बोलगंडा जि. नादिया ही शाळाच अस्तित्वात नसल्याचं आढळून आलं. याच सर्व खोट्या कागदपत्रांच्या आधारावर त्याने आधार कार्ड व पॅनकार्डसुद्धा काढल्याचं तपासात समोर आलं असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

(bjp north mumbai minority wing president is resident of bangladesh says maharashtra home minister anil deshmukh)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा