अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्या मालकीचं 'बॅस्टीअन' या हॉटेलच्या पार्किंग लॉटमधून एक आलिशान गाडी चोरीला गेली आहे. या कारची किंमत तब्बल 80 लाख रुपये इतकी आहे. शिल्पा आणि राज यांच्या मालकीच्या हॉटेलच्या पार्किंग लॉटमधून बीएमडब्यू झेड फोर ही आलिशान कार चोरीला गेल्याचं उघड झालं आहे.
शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये तक्रार
मिळालेल्या माहितीनुसार, 'बॅस्टीअन'च्या पार्किंग लॉटमधून रुहान खान नावाच्या व्यक्तीची आलिशान बीएमडब्यू झेड फोर कार चोरीला गेली आहे. 34 वर्षीय रुहान खान हा एक उद्योजक आहे.
दादरमधील शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. भारतीय न्याय संहिता कलम 303 (2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकार हा 27 ऑक्टोबर रोजी मध्यरात्र उलटून गेल्यानंतर पहाटेच्या वेळी घडल्याची माहिती समोर आली आहे.
उद्योगपती रुहान खान यांनी केलेल्या आरोपानुसार हॉटेलच्या बेसमेंटमधून कार चोरीला गेली. रुहान खान यांनी आपण आपल्या गाडीची चावी व्हॅले स्टाफकडे दिली होती. कार पार्क करण्याची तसेच हॉटेलच्या दाराशी आणून देण्याची जबाबदारी व्हॅले पार्क करणाऱ्याची होती. मात्र व्हॅले पार्किंग करणाऱ्याकडे कार पार्क केल्यानंतर चावी दिल्यानंतरही ही कार चोरीला गेल्याचा रुहान खान यांचा आरोप आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुहान खान आणि त्यांचा एक मित्र रात्री 1 वाजण्याच्या सुमारास हॉटेलमध्ये आले होते. कार पार्क केल्यानंतर त्यांनी चावी हॉटेलच्या प्रवेशद्वाराजवळ व्हॅलेचं काम करणाऱ्या व्यक्तीकडे दिली. हे हॉटेल पहाटे चार वाजता बंद होतं. त्यावेळेस बाहेर पडलेल्या रुहान खान यांनी व्हॅलेकडे कारची चावी मागितली असता, दोन अनोळखी व्यक्ती आधीच कारची चावी व्हॅलेकडून घेऊन कार तिथून घेऊन गेल्याचं स्पष्ट झालं.
रुहान खान यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीमध्ये, "बराच वेळ मी कारबद्दल विचारणा केल्यानंतर त्यांनी मला तुम्ही पार्क केलेल्या ठिकाणी तुमची कार दिसत नसल्याचं सांगितलं." त्यानंतर सीसीटीव्हीमध्ये दोन अनोखळी व्यक्ती एका वेगळ्याच कारमधून आल्या आणि रुहान खान यांची कार घेऊन गेल्याचं दिसून आलं. सध्या पोलीस या चोरांचा शोध घेत आहेत.
हेही वाचा