बोगस कॉलसेंटर प्रकरणी फरार अभिनेत्रीला अटक

मुंबईच्या गुन्हे शाखा ९ च्या पोलिसांनी सप्टेंबर २०१८ मध्ये अंधेरीत सुरू असलेल्या बनावट काॅलसेंटरवर कारवाई केली होती. या कारवाईतील फरार तरुणीस गुन्हेे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी अटक केली.

बोगस कॉलसेंटर प्रकरणी फरार अभिनेत्रीला अटक
SHARES

मुंबईच्या गुन्हे शाखा ९ च्या पोलिसांनी सप्टेंबर २०१८ मध्ये अंधेरीत सुरू असलेल्या बनावट काॅलसेंटरवर कारवाई केली होती. या कारवाईतील फरार तरुणीस गुन्हेे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी अटक केली. आरती सक्सेना असं या तरुणीचं नाव असून ती बाॅलीवूडमधील अभिनेत्री आहे. या फसवणुकीत संबधित कंपनीत तिने ही स्वत:चे पैसे गुंतवल्याचं तपासात पुढं आलं होते.


धमकी देऊन पैसे

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांना सप्टेंबर २०१८ मध्ये अंधेरीच्या डी.एन.नगर परिसरातील एस.व्ही.रोडवरील एका इमारतीत हे फेक काॅल सेंटर सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्या काॅलसेंटरवर कारवाई केली. एक्सफिनिटी आणि इनोव्हेशन ३६० अशी या दोन काॅलसेंटरची नावे आहेत. या दोन्ही कंपनीद्वारे अमेरिकेतील नागरिकांशी संपर्क साधून संबंधित संगणक आणि लॅपटाॅपवर मालवेअर सारख्या भयानक सायबर अॅटॅक केल्याचं सांगत तो काढण्यासाठी पैसे मागायचे. तसंच पैसे न पाठवल्यास डेटा डिलिट करण्याची धमकी द्यायचे. 


अमेरिकन नागरिकांची फसवणूक

या कंपनीद्वारे शेकडो अमेरिकन नागरिकांना फसवण्यात आलं होतं. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यावेळी ९ जणांना अटक केली होती. या काॅलसेंटरमध्ये त्यावेळी ३६ जण कामाला होते. या काॅलसेंटरमधून दिवसाला अमेरिकेत शेकडो फोन करण्यात येत होते. आतापर्यंत लाखो जणांचा डेटा पोलिसांनी या काॅलसेंटरमधून हस्तगत केला आहे.

या कंपनीत अभिनेत्री आरती सक्सेना हिच्यासह ४ जणांनी पैसे गुंतवल्याचे तपासात पुढे आल्यानंतर पोलिस आरतीचा शोध घेत होते. मात्र, आरतीने अटक टाळण्यासाठी अटकपूर्व जामीन मिळवल्याने पोलिसांना तिला अटक करता येत नव्हती. या अटक पूर्व जामीनाची मुदत सोमवारी २५ मार्च रोजी संपली. दरम्यान, जामीन वाढवून हवा असल्याचं कारण देत आरतीनं न्यायालयात धाव घेतली. मात्र, तिचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्याने गुन्हे शाखा ९ च्या पोलिसांनी तिला न्यायालय परिसरातून अटक केली. 


दोषारोपपत्र दाखल

या प्रकरणी डिसेंबर महिन्यात पोलिसांनी संबंधितांविरोधात ३ हजार ६०० पानी दोषारोपपत्रही दाखल केले. त्यात अमेरिकेतील नागरिकांनी ट्विटरद्वारे केलेल्या १७ तक्रारी आणि ३० जणांच्या जबाबाची नोंद आहे. दरम्यान, आरतीला आता न्यायालयाने २८ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलिस अधिक तपास करत आहेत.




हेही वाचा -

हसीना पारकरच्या मुंबईतील घराचा होणार लिलाव

व्याजदराच्या आमिषाने वकिलाला २४ लाखांना गंडा



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा