शाहरुखचा मुलगा NCBच्या ताब्यात, क्रूझवर रंगलेली रेव्ह पार्टी

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यालाही ताब्यात घेण्यात आल्याची बातमी ANI या वृत्त संस्थेनं दिली आहे.

शाहरुखचा मुलगा NCBच्या ताब्यात, क्रूझवर रंगलेली रेव्ह पार्टी
SHARES

मुंबईच्या समुद्रात एका क्रूझवर ( CRUISE SHIP) सुरू असलेल्या हायप्रोफाईल ड्रग्स पार्टीचा एनसीबीनं पर्दाफाश केला. NCB नं प्रवासी म्हणून मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या लक्झरी क्रूझ Cordelia मध्ये जाऊन सीक्रेट ऑपरेशन केलं.

सुमारे ७ तास चाललेल्या छाप्यादरम्यान, एनसीबीनं (NCB) मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त केली आहेत. एनसीबीनं यात एकूण ८ जणांना ताब्यात घेतलं असून त्यात दोन महिलांचाही समावेश आहे. तर बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यालाही ताब्यात घेण्यात आल्याची बातमी ANI या वृत्त संस्थेनं दिली आहे.

एनसीबीनं आर्यन खानलाही ताब्यात घेतलं असून त्याची सध्या चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र आपल्याला गेस्ट म्हणून बोलावलं असल्याचं आर्यन खाननं सांगितल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

NCB सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ड्रग्ज प्रकरणात क्रुझवरुन ताब्यात घेतलेल्या आर्यन खानचा जबाब नोंदवण्यात आला आहे.

आर्यन खाननं चौकशीत सांगितलं की, त्याला या क्रुझवर गेस्ट म्हणून बोलावण्यात आलं होतं आणि त्याच्याकडून कुठल्याही प्रकारचं मानधन देण्यात आलेलं नव्हतं. केवळ आपल्या नावाचा वापर करुन इतरांना बोलावण्यात आलं होतं.

या कारवाईनंतर NCB नं अधिकृत माहिती (Official Statement of NCB) दिली आहे. एनसीबीनं दिलेल्या माहितीनुसार, मिळालेल्या विशिष्ट माहितीच्या आधारे, NCB मुंबईच्या अधिकाऱ्यांनी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या Cordelia क्रूझवर छापा टाकला.

या ऑपरेशन दरम्यान MDMA/ एक्स्टसी, कोकेन, एमडी (Mephedrone) आणि चरस सारख्या विविध ड्रग्स जप्त करण्यात आले. यात एकूण ८ जणांना ताब्यात घेतलं असून त्यात दोन महिलांचाही समावेश आहे. सध्या ताब्यात घेतलेल्यांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणी एनसीबी मुंबईनं गुन्हा ९४/२१ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

तसंच एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे म्हणाले की, आर्यन खानवर कोणत्याही आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही किंवा त्याला आतापर्यंत अटकही करण्यात आलेली नाही.

याप्रकरणी एनसीबीनं क्रूझ पार्टीची आयोजन केलेल्या सहा आयोजकांनाही बोलावलं आहे. एनसीबीनं आर्यन खानचा फोन जप्त केला असून अधिकाऱ्यांकडून त्याची तपासणी केली जात आहे. एनसीबी जप्त केलेल्या फोनवरून चॅट्सचा तपास करत आहे. तसंच क्रूझवरून ताब्यात घेण्यात आलेल्या सर्वांचे मोबाईल फोनही जप्त करण्यात आले आहेत आणि सर्व तपशील देखील तपासले जात आहेत.



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा