'बॉम्बे'ला म्हणाले 'बॉम्ब', केरळच्या 6 तरूणांची एटीएसकडून चौकशी

  Mumbai
  'बॉम्बे'ला म्हणाले 'बॉम्ब', केरळच्या 6 तरूणांची एटीएसकडून चौकशी
  मुंबई  -  

  'बॉम्बे'चा उच्चार 'बॉम्ब' असा करणे केरळच्या 6 तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. केरळवरुन आलेले हे तरुण पनवेल ते सीएसटी अशा लोकल ट्रेनमधील प्रवासात मुंबई म्हणजेच पूर्वीच्या 'बॉम्बे'चा उच्चार 'बॉम्ब' असा करत होते. हा संवाद त्यांच्या जवळच्याच सीटवर बसलेल्या एका मुलाने ऐकला आणि त्याची माहिती थेट आरपीएफ कंट्रोल रुमला फोन करून दिली. त्यानंतर ही लोकल सीएसटीला पोहोचताच पोलिसांनी या सहा तरुणांना ताब्यात घेतले. मोहम्मद यूनिस यूएस, मोहम्मद ए सिद्दीकी, अदिश, अब्दुल रउफ मोहम्मद, आणि यूनिस के.के के तौर अशी या तरुणांची नावे आहेत. मात्र चौकशीत हा संवादातील घोळ असल्याचे उघडकीस आल्यानंतर सर्व तरूणांना सोडून देण्यात आले.

  याप्रकरणी वाशी जीआरपीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील यांनी सांगितले की, केरळवरून आलेल्या या सहा जणांची आम्ही तसेच एटीएसने कसून चौकशी केली. परंतु त्यांच्याकडे काहीच संशयास्पद आढळून न आल्याने आम्ही त्यांना सोडून दिले.

  केरळचे हे 6 तरुण उर्दू शिकण्यासाठी राजापूरला जाणार होते. त्यांनी तिरुअनंतपुरम ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान धावणारी नेत्रावती एक्स्प्रेस पकडली. या प्रवासात त्यांनी एक दिवस मुंबई दर्शन करण्याचे ठरवले होते. त्यासाठी त्यांनी पनवेलला उतरून पनवेल-सीएसटी लोकल पकडली. गाडीत बसलेले असताना त्यांच्या मित्राने त्यांना कुठे पोहोचलात? असा मेसेज केला. त्याला 'बॉम्ब' असे उत्तर एकाने दिले. शेजारीच बसलेल्या मुलाने हा मेसेज वाचला आणि या सगळ्यांवर त्याला संशय आला.

  सर्व तरूण आपापसांत मल्याळममध्ये बोलत असल्याने वारंवार 'बॉम्बे' चा उच्चार 'बॉम्ब' असा करत होते. त्याने या मुलाचा संशय आणखीनच बळावला. त्यानंतर या मुलाने गुपचूप या सगळ्यांचा व्हिडीयो बनवला आणि आरपीएफ कंट्रोलला फोन केला.

  हा फोन येताच तात्काळ तपासाची सूत्रे फिरली आणि ही लोकल सीएसटी स्थानकात पोहोचताच या सहाही तरूणांना ताब्यात घेण्यात आले. आरपीएफ, जीआरपी तसेच राज्य एटीएसने देखील या तरूणांची चौकशी केली. मात्र एकमेकांशी संवाद साधताना 'बॉम्बे' चा उच्चार 'बॉम्ब' असा केल्याने हा सगळा घोळ झाल्याचे स्पष्ट होताच या सगळ्यांना सोडून देण्यात आले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.