मुकेश अंबानीच्या अँटिलियाबाहेर स्फोटकाने भरलेली स्कॉर्पिओ सापडली

बुधवारी मध्यरात्री एक वाजता अँटिलियाजवळ ही स्कॉर्पिओ पार्क केल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फूटेजमधून समोर आलं आहे.

मुकेश अंबानीच्या अँटिलियाबाहेर स्फोटकाने भरलेली स्कॉर्पिओ सापडली
SHARES

रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या कारमध्ये जिलेटिन कांड्या होत्या. मुंबई पोलीस, फॉरेन्सिक टीम, आणि श्वानपथकं घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे. या स्फोटकांसह एक चिठ्ठीही सापडली असून त्यामधून घातपाताची धमकी दिल्याचं समजतं.

अल्टामाऊंट रोडवर मुकेश अंबानी यांची भव्य ‘अँटिलिया’ इमारत आहे. अँटिलियापासून जवळच काही अंतरावर एका स्कॉर्पियो कार उभी होती. त्यामध्ये जिलेटीनच्या कांड्या सापडल्या आहेत. बुधवारी मध्यरात्री एक वाजता अँटिलियाजवळ ही स्कॉर्पिओ  पार्क केल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फूटेजमधून समोर आलं आहे. तर गुरूवारी दुपारी तीन वाजता या कारसंदर्भातील फोन आल्याचं कळतं.

अंबानी यांच्या ताफ्यातील गाडीचा नंबर आणि स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कारचा नंबर सारखाच असल्याचं समोर आलं आहे. कारमध्ये जिलेटिनच्या २० कांड्या सापडल्या आहेत. मुख्यमंत्री कार्यालय, गृहमंत्रालयाला संबंधित प्रकाराची माहिती देण्यात आली आहे. तसंच केंद्रीय गृहमंत्रालयालाही याबाबत कळवण्यात आलं आहे. 

मला या प्रकरणाची माहिती आताच मिळाली आहे. मुंबईत मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली कार सापडली आहे. या प्रकरणाचा संपूर्ण तपास गुन्हे शाखा करत आहे. लवकरच सत्य समोर येईल, अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. तर मुकेश अंबानी यांनी घाबरण्याचं कारण नाही. गरज पडली तर अंबानी कुटुंबाची सुरक्षा वाढवली जाईल, असं गृहराज्यमंत्री देसाई यांनी म्हटलं आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा