तुमची स्वत:ची कार आहे? मग कारचोरांपासून सावधान!

 Dindoshi
तुमची स्वत:ची कार आहे? मग कारचोरांपासून सावधान!

दिंडोशी - कॉल सेंटरमध्ये पिकअप आणि ड्रॉपला लावण्याच्या नावाखाली कार चोरणाऱ्या भामट्याला दिंडोशी पोलिसांनी अटक केली आहे. अजय साळुंखे (34) असं या चोराचं नाव असून त्याची स्वत:ची चहाची टपरी देखील आहे.

अजय कॉलसेंटर किंवा इतर कंपन्यांमध्ये पिकअप-ड्रॉपसाठी कार भाड्याने देणारा दलाल असल्याची बतावणी करत असे. यानंतर मूळ मालकाची कार घेऊन ती काही दिवसांनी भलत्याच व्यक्तीला विकत असे.

पण अजयचा हा प्रताप त्याच्याच चुकीमुळे उघडा पडला. अकबर नावाच्या एका व्यक्तीची कार अजयनं अशीच बतावणी करून घेतली आणि ती दुस-या व्यक्तीला विकायला निघाला. पण तिथेच तो फसला. त्यानं गळाला लावलेलं गिऱ्हाईक योगायोगानं अकबरचा मित्रच निघाला. आपण खरेदी केलेली कार मित्र अकबरला दाखवायला आला. अकबरनं कार ओळखली आणि लगेच पोलिसात तक्रार दाखल केली.

अकबरने दिलेल्या तक्रारीनंतर दिंडोशी पोलिसांनी आरोपी अजयला अटक केली. अजय साळुंखे हा शाबान कंपाउंडच्या कन्या पाढा इथला रहिवासी आहे. अशाप्रकारे त्याने अजून किती जणांना गंडा घातला आहे याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.

Loading Comments