अनधिकृत तिकीट विक्री करणाऱ्या दलालांवर मध्य रेल्वेची कारवाई

मुंबई महानगरात मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या तिकिटांची अनधिकृत विक्री करणाऱ्या दलालांवर मध्य रेल्वेने कारवाई केली

अनधिकृत तिकीट विक्री करणाऱ्या दलालांवर मध्य रेल्वेची कारवाई
SHARES

मुंबई महानगरात मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या तिकिटांची अनधिकृत विक्री करणाऱ्या दलालांवर मध्य रेल्वेने कारवाई केली असून डिसेंबरमध्ये ३ दलालांना अटक करून सुमारे ४०० ई-तिकिटे हस्तगत करण्यात आली. जप्त केलेल्या तिकिटांची एकूण किंमत ६ लाख रुपयांहून अधिक आहे.

आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून तिकीट काढताना प्रतीक्षायादीचा सामना करावा लागतो. रेल्वेने संकेतस्थळावर तिकीट विक्री सुरू केल्यानंतर अवघ्या काही सेकंदातच प्रतीक्षायादी कशी येते, असा प्रश्न सर्वसामान्यांना कायम पडतो. यात दलालांचे जाळे कार्यरत असल्याचे दलालांच्या धरपकडीतून स्पष्ट झाले आहे.

मागील ४ महिन्यांपासून काही गाड्यांसाठी प्रतीक्षायादी जारी करण्यात येत असून प्रवाशांना तिकिटे मिळणेही कठीण झाले आहे. त्याचाच गैरफायदा तिकीट दलाल घेत असल्याची माहिती समोर येत आहे. काही प्रवासी अशा दलालांकडे जातात आणि त्यांच्याकडून प्रवाशांना आरक्षण असलेल्या तिकिटाचे आमिषही दाखवले जाते.

अनधिकृत तिकीट विक्री करणाऱ्या अशा दलालांची धरपकड डिसेंबरमध्ये मुंबईत करण्यात आली आहे. डिसेंबरमध्ये ६ लाख ४३ हजार ५२७ रुपये किमतीची ४०० ई-तिकिटे जप्त करण्यात आली असून, आतापर्यंत ३ दलालांना अटक करण्यात आली आहे. शिवाय, डिसेंबरमध्ये मेल-एक्स्प्रेस गाड्यांमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या २९६ प्रवाशांना पकडण्यात आले आहे. त्यांच्यावर केलेल्या कारवाईतून जवळपास २ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला, तर दुसऱ्या प्रवाशाला अनधिकृतपणे तिकीट हस्तांतरण केल्याची ६४ प्रकरणे उघडकीस आली आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा