दर रविवारी मुख्यालयात पोलिसांचा वाजणार ‘बॅंड’

१ मेपासून दर रविवारी ‘चेंज ऑफ गार्ड’ पोलीस मुख्यालयासमोरील प्रांगणात आयोजित केले जाणार

दर रविवारी मुख्यालयात पोलिसांचा वाजणार ‘बॅंड’
SHARES

लंडन येथील बंकिंगहॅम पॅलेसच्या धर्तीवर महाराष्ट्र पोलीस मुख्यालयात ‘चेंज ऑफ गार्ड’ ही अभिनव संकल्पना येत्या महाराष्ट्र दिनापासून सुरू करण्यात येणार आहे. या संकल्पनेमुळे महाराष्ट्र पोलिसांचे एक वेगळे रुप नागरिकांना पहायला मिळेल. तसेच देश -विदेशातील पर्यटकांसाठी मोठे आकर्षण ठरेल. अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंगळवारी दिली. 

 ब्रिटनच्या राजघराण्याचा राजप्रासाद ‘बकिंगहॅम पॅलेस’ येथे सुरक्षा रक्षकांचे अत्यंत प्रेक्षणीय असे ‘चेंज ऑफ गार्ड’ हे प्रात्यक्षिक होत असते. आठवडय़ातील ठराविक दिवशी होणारे हे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी स्थानिक जनतेसह जगभरातील पर्यटक त्या ठिकाणी उपस्थित राहतात. अशा प्रकारचे प्रात्यक्षिक पोलीस महासंचालक कार्यालय (पोलिस मुख्यालय) येथे झाल्यास हे येथील नागरिकांसह मुंबईस भेट देण्यासाठी येणाऱ्या देश -विदेशातील पर्यटकांसाठी मोठे आकर्षण ठरेल. येत्या १ मेपासून दर रविवारी ‘चेंज ऑफ गार्ड’ पोलीस मुख्यालयासमोरील प्रांगणात आयोजित केले जाणार आहे.  एका पाळीतील सुरक्षारक्षक आपला कार्यभार दुसऱ्या पाळीतील सुरक्षारक्षकांकडे सोपवितात अशी ‘चेंज ऑफ गार्ड’ची संकल्पना आहे. हे होत असताना पोलीस बँडची धून तसेच आकर्षक परेडचे दर्शनही मुंबईकरांना घडणार आहे.

 गृहमंत्री अनिल देशमुख आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी पोलीस महासंचालक कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी या विषयाच्या अनुषंगाने झालेल्या चर्चेत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.  त्याच बरोबर पोलिस दलात कार्यरत असताना, प्राणाची आहुती देत शहीद झालेल्या जवानांनाच्या सन्मानार्थ पोलिस मुख्यालयात शहिद गॅलरी स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती देशमुखांनी दिली.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा