चिमुरड्याचं अपहरण करणारं कुटुंब अटकेत

 Powai
चिमुरड्याचं अपहरण करणारं कुटुंब अटकेत

मुंबई - मुंबईच्या पवई पोलिसांनी 3 वर्षाच्या चिमुरड्याची अपहरणकर्त्यांच्या विळख्यातून सुटका केली आहे. हे तिघेही रस्त्या शेजारी जडी बुटी विकणारे असून लहानग्या मुलाला परराज्यात घेऊन जाण्याच्या तयारीत असताना त्यांना पकडण्यात आलं. या प्रकरणी पोलिसांनी रवीसिंग ग्यानसिंग (३६) सह त्याची पत्नी गीता (३४) आणि त्याच्या १२ वर्षीय मुलीला अटक केली आहे.

पाच मार्चला संध्याकाळी आदर्श यादव नावाचा तीन वर्षांचा मुलगा घराबाहेर खेळत होता. खेळत खेळत तो थोडा लांब गेला. एका मुलीची नजर त्याच्यावर पडली. कोणी बघत नाही, असं बघून ती मुलगी त्या मुलाला थेट आपल्या घरी घेऊन गेली आणि या कुटुंबाने तिथून पळ काढला.

मुलगा हरवल्याचं लक्षात येताच कुटुंबाने पवई पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज बघितले असता त्यात हे जडी बुटी विकणारे कुटुंब मुलाला घेऊन जाताना दिसले. मग पोलिसांनी अापला मोर्चा इतर जडी बुटी विकणाऱ्यांवर वळवला. तेव्हा मुंब्राला रवी सिंगचे सासरे राहत असल्याचे समजले. सासऱ्यांकडून पोलिसांना रवीसिंग तुर्भेला असल्याचं समजलं आणि मग तुर्भेवरुन रवी सिंघला अटक करून पोलिसांनी या चिमुरड्याची सुटका केली.

Loading Comments