चायनीज नीट न झाल्याचा जाब विचारला, 'त्याने' उकळतं तेल अंगावर फेकलं!


चायनीज नीट न झाल्याचा जाब विचारला, 'त्याने' उकळतं तेल अंगावर फेकलं!
SHARES

चायनीज नीट न बनवल्याचा जाब विचारल्याने एका विक्रेत्याचा संताप एवढा अनावर झाला की त्याने रागाच्या भरात थेट ग्राहकावर उकळत तेल फेकलं. मंगळवारी रात्री १२ वाजता उल्हासनगरमधील व्हिनस चौकातील 'हाॅटेल कोळीवाडा' येथे ही भयंकर घटना घडली.


काय आहे प्रकरण?

विकी म्हस्के (१९) नावाचा तरूण विजय पठारे या मित्रासोबत रात्री ११.३० वाजता व्हिनस चौकातील क्रिटीकेअर हाॅस्पीटलजवळच्या 'हाॅटेल कोळीवाडा' या चायनीज स्टाॅलवर चायनीज खाण्यासाठी गेला. चायनीज पदार्थ नीट न झाल्याने विकीने त्याचा जाब हाॅटेल मालकाला विचारताच, त्यांनी आणि हाॅटेलमधील कर्मचाऱ्यांनी विकी तसेच त्याच्या मित्राला मारहाण केली. एवढंच नव्हे, तर त्यांना पकडून ठेवलं.


'असा' झाला हल्ला

विकीने आपला भाऊ दीपक म्हस्के याला फोन करून बोलावून घेतलं. मारहाणीनंतर विकीचा मोठा भाऊ दीपक चायनीज स्टॉलवर आल्यावर त्याने भावाला मारहाण केल्याचा जाब विचारला. त्यावेळी चायनीज विक्रेत्याने त्याच्या अंगावर चक्क उकळतं केलं फेकलं.


सीसीटीव्हीत प्रकार कैद

या जीवघेण्या हल्ल्यामुळे दीपकचा चेहरा भाजल्याने त्याला त्वरीत सेंट्रल हाॅस्पिटलमध्ये नेण्यात आलं. याप्रकरणी दीपकने विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली असून हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.


अद्याप गुन्हा दाखल नाही

याप्रकरणी अद्याप विठ्ठलवाडी पोलिसांनी हाॅटेलमाल, त्याचा मुलगा वा कुठल्याही कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल केलेला नाही. हॉटेल कोळीवाडा रात्री २ वाजेपर्यंत सुरू असूनही त्याच्यावर कारवाई होत नसल्याचं म्हटलं जात आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा