खोटी 'एफआयआर' देऊन चीनी महिलेला गंडवले

 Kandivali East
खोटी 'एफआयआर' देऊन चीनी महिलेला गंडवले
Kandivali East, Mumbai  -  

वकिलाचे काम आपल्या अशिलाला न्याय मिळवून देण्याचे असते. पण कांदिवलीतली एका वकील महिलेने स्वत:च्या अशिलाला खोटा 'प्रथम दर्शनी अहवाल' (एफआयआर) दिल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी बोरीवली दंडाधिकारी न्यायालयाने पूर्वी शहा नावाच्या वकिलाविरोधात कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. विशेष म्हणजे ज्या महिलेला पूर्वी शहाने फसवले आहे, ती महिला चीनची नागरिक आहे.

2015 साली हांन शेन नावाची महिला भारतात आली होती. मुंबईतील रणजीत झा नावाच्या व्यापाऱ्यासोबत हांन शेन यांनी एक करार केला होता. पण त्यात हांन यांची फसवणूक झाली. या फसवणुकीची तक्रार करण्यासाठी त्यांनी महिला वकील पूर्वी शहा यांना गाठले आणि यासाठी 4700 डॉलर म्हणजेच 3 लाखांहून अधिक रक्कम मोजली. त्यानंतर ही चिनी महिला आपल्या मायदेशी म्हणजेच चीनला परतली.

पुढील काही दिवसांतच पूर्वी यांनी हांन शेन यांना समता नगर पोलीस ठाण्यातील 'एफआयआर'ची एक प्रत पाठवली. काही महिन्यांनी हांन मुंबईत आल्या, तेव्हा त्यांना धक्काच बसला. ज्या 'एफआयआर'ची प्रत पूर्वी शहा यांनी हांन यांनी पाठवली होती, तसा कुठलाही 'एफआयआर' अस्तित्वात नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ दुसरा वकील गाठून पूर्वी शहा यांच्याविरोधात न्यायालयात धाव घेतली.

न्यायालयाने या प्रकरणी समता नगर पोलिसांना चौकशी करण्याचे आदेश दिले. समता नगर पोलिसांनी चौकशी केल्यावर तसा कुठलाही 'एफआयआर' अस्तित्वात नसल्याचे न्यायालयाला सादर केलेल्या अहवालात म्हटले. एवढेच नाही, तर पूर्वी शहा हिनेच हा बनावट 'एफआयआर' हांन शेन यांना पठवल्याचे पोलिसांनी अहवालात नमूद केले.

समतानगर पोलिसांच्या या अहवालानंतर बोरीवली दंडाधिकारी न्यायालयाने पूर्वी शहा हिच्याविरुद्ध सुनावणी सुरू केली आहे. या प्रकरणी न्यायालय काय निर्णय घेते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Loading Comments