पतसंस्थेच्या कर्मचाऱ्याला भररस्त्यात लुटलं


पतसंस्थेच्या कर्मचाऱ्याला भररस्त्यात लुटलं
SHARES

मुंबईच्या रस्त्यांवर पतसंस्थेच्या ठेवीदारांचे पैसे घेऊन निघालेल्या पतसंस्थेच्या कर्मचाऱ्याला दुचाकीहून आलेल्या तिघांनी चाकूचा धाक दाखवून लुटले. भायखळा परिसरात रविवारी दुपारी ही घटना घडली असून याप्रकरणी आग्रीपाडा पोलिस ठाण्यात तीन अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


क्रेडिट सोसायटी चालवण्याचा धंदा

डोंबिवलीच्या दत्तूसाई काॅम्प्लेक्समध्ये राहणारे रतन नरहरी कांबळे हे रत्नाकर को-आॅप. क्रेडिट सोसायटी चालवतात. रविवारी दैनंदिन ठेवीदारांचे पैसे गोळा करणे, पासबुक, कर्जवाटपाची कागदपत्रे घेऊन ते घराबाहेर पडले होते. सकाळपासून कुर्ला, वांद्रे, दादर, भायखळा येथील मदनपुरा मार्केटमधील ठेवीदारांच्या भेटी घेऊन रतन हे टॅक्सीतून भायखळाच्या बी. ए. रोडहून स्थानकाच्या दिशेने निघाले होते.


चाकूचा धाक दाखवला

नागपाडाच्या खडा पारशी जंक्शनजवळील मॅरेथाॅन इमारतीजवळ रतन यांची टॅक्सी आली असता मागून दुचाकीहून आलेल्या तिघा अनोळखी तरुणांनी रतन यांची टॅक्सी अडवली. त्यावेळी रस्त्यावर नागरिकांची वर्दळ फारच कमी होती. हे पाहून तिघांनी चाकूचा धाक दाखवून रतन यांना टॅक्सीबाहेर उतरण्यास सांगितले. टॅक्सीबाहेर आल्यानंतर तिघांनी रतन यांच्याजवळ असलेली पैशांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी रतन यांनी प्रतिकार केल्यावर एकाने रतन यांना मारहाण करत त्यांच्या हातातील बॅग हिसकावून घेतली. त्यांनी अारडाअोरड केल्यानंतर आरोपींनी तेथून पळ काढला.


अोळख पटवण्याचे काम सुरू

याप्रकरणी रतन यांनी आग्रीपाडा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असून पोलिस सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. या तिघांनी हे कृत्य करण्यापूर्वी रतन यांच्यावर पाळत ठेवली असावी. तसेच यामागे कुणातरी ओळखीच्या व्यक्तीचा हात असल्याचा संशय पोलिसांना असून ते आरोपींचा शोध घेत आहेत.


हेही वाचा -

बायकोचे न्यूड फोटो सासऱ्याला पाठवले, विक्षिप्त नवऱ्याला अटक

गँगस्टर गुरू साटमचे ५ हस्तक जेरबंद



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा