फिर्यादीच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन पोलिस ठाण्यात

नवी मुंबईत राहणारा तरुण तक्रार करण्यासाठी पोलिस ठाण्यात गेला असता तेथे चक्क त्याचा वाढदिवस साजरा झाला.

फिर्यादीच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन पोलिस ठाण्यात
SHARES

आपला वाढदिवस घरातल्यांसोबत साजरा करण्याची मजा वेगळीच असते. पण आपल्या आनंदात नकळत पोलिस सहभागी झाले तर... होय नवी मुंबईत राहणाऱ्या तरुणासोबत असंच काहीसं झालं आहे. तो तक्रार करण्यासाठी पोलिस ठाण्यात गेला असता तेथे चक्क त्याचा वाढदिवस साजरा झाल्याची माहिती रविवारी समोर आली.


संपूर्ण प्रकार

पाच वर्षांपूर्वी नवी मुंबईत रहायला गेलेल्या असिम कोंडकर याचा रविवारी वाढदिवस होता. असिम पूर्वी माझगाव परिसरात रहायचा. त्यावेळी रहिम विरानी, करीम विरानी, विनोद जैन हे त्याचे खास मित्र होते. मात्र असिम नवी मुंबईला रहायला गेल्यामुळे त्यांच्या भेटीगाठी कमी होत होत्या. अखेर रहिम विरानीने रविवारी पिकनिकचा प्लान बनवला होता. कारण त्या दिवशी असिमचा वाढदिवस होता. असिमला पिकनिक स्पॉटला ते सर्पराइज पार्टी देणार होते.

त्यानुसार रहिम विरानी, करीम विरानी, विनोद जैन आणि बर्थडे बॉय असिम हे चौघेही गाडीने नवी मुंबई मार्गे कसारा येथे निघाले होते. तोच रहिम विरानीला त्याचा चुलत भाऊ अरबाज सय्यद याचा फोन आला. त्याने रहिमची दुचाकी जागेवर दिसत नसल्याचं फोनवर सांगत ती चोरीला गेल्याची माहिती दिली. त्यामुळे अर्ध्या रस्त्यातून हे चौघे घराच्या दिशेने निघाले.

तोपर्यंत अरबाज भायखळा पोलिस ठाण्यात पोहचला होता. त्यावेळी पोलिस ठाण्यात ड्यूटी ऑफीसर स्वप्नील पाटील आणि प्रमोद शिंदे होते. पोलिसांना अरबाजने गाडी चोरीला गेल्याची सर्व हकिगत सांगितली. तक्रार नोंदवण्याचं काम सुरू होतं. मात्र गाडीचा मालक रहिम याला पोलिस ठाण्यात येण्यास उशीर झाल्याने मध्यरात्री कुठे फिरायला गेल्याचं पोलिसांनी रोखून त्याला विचारलं. त्यावेळी रहिमने असिम या माझ्या जिवलग मित्राचा वाढदिवस असून तो साजरा करण्यासाठी कसारा येथे जात असल्याचं त्याने सांगितलं.


पोलिसांनी दिल्या शुभेच्छा

एकीकडे तक्रार नोंदवण्याचं काम सुरू असताना बर्थडे बॉयला शुभेच्छा देण्यासाठी आणि होऊ न शकलेल्या पार्टीमुळे हिरमुसलेल्या असिमचा वाढदिवस साजरा करण्यासाठी केकची आर्डर दिली. तोपर्यंत भायखळा पोलिसांच्या दुसऱ्या पथकाने रहिमची दुचाकी चोरणाऱ्यास पूर्व द्रुतगती मार्गाहून अटक केली होती. सिद्धार्थ सकपाळ (19) असं या आरोपीचं नाव होतं. ऐकीकडे पोलिस ठाण्यात वाढदिवसही साजरा झाला आणि दुसरीकडे चोरीला गेलेली मित्राची दुचाकीही मिळाल्यानं असिमसह सर्वच जण आनंदात होते. पोलिस हे नाव ऐकताच भीती वाटतं. त्यामुळे त्यांच्यासोबत असाही वाढदिवस साजरा होईल याची कल्पनाही केली नव्हती, असं असिमने सांगितलं.


आरोपींना पोलिस कोठडी

सिद्धार्थच्या चौकशीतून पुढे पोलिसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या मोठ्या टोळीचा अवघ्या सहा तासात छडा लावला. सिद्धार्थसोबत दुचाकी चोरी करणाऱ्या शाहिद हसन रजा खान (24) आणि शमिम अब्दुल रहिम खान (20) या सराईत दुचाकी चोरांना पोलिसांनी अवघ्या सहा तासात गोवंडीहून अटक केली. मात्र निमित्त ठरलं ते असिमच्या वाढदिवसाचं. या सर्व आरोपींना न्यायालयाने 24 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा