भोईवाडा कोर्टात न्यायाधीशांच्या समोरच दोघांवर चाकूहल्ला


भोईवाडा कोर्टात न्यायाधीशांच्या समोरच दोघांवर चाकूहल्ला
SHARES

आरोपी निर्दोष सुटल्याने तक्रारदाराने न्यायाधीशांच्या समोरच त्यांच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार भोईवाडा कोर्टात बुधवारी दुपारी घडला. या प्रकरणी हरिश्चंद्र शिरकर (६७) या हल्लेखोराला पोलिसांनी अटक केली असून हल्ला करण्यात आलेल्या दोघांची प्रकृती गंभीर असल्याचं म्हटलं जात आहे. महत्त्वाचं म्हणजे ही व्यक्ती कोर्टात चाकू घेऊन गेल्याने कोर्टाच्या सुरक्षेवरही मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.


काय आहे प्रकरण?

सन २००९ साली दादर पोलीस ठाण्यात भादंवि ३२४ अंतर्गत दाखल गुह्याचा बुधवारी भोईवाडा कोर्टात फैसला होता. २००९ मध्ये हरिश्चंद्र शिरकर यांना मारहाण केल्याप्रकरणी नंदेश कडवालकर आणि महेश म्हप्रकार यांना आरोपी करण्यात आलं होतं. बुधवारी या गुह्याचा निकाल होता. त्यासाठी भोईवाडा कोर्टातील कोर्ट क्रमांक ५ मध्ये दोन्ही आरोपींसह तक्रारदार हरिश्चंद्र शिरकर हे दोघंही उपस्थित होते.


चिडवलं म्हणून

सुनावणीत न्यायाधीशांनी आपला फैसला सुनावत महेश आणि नंदेश अशा दोघांनाही निर्दोष सोडलं. हा निकाल ऐकून हरिश्चंद्र याचा राग अनावर झाला. कारण निकालाच्या सुनावणीआधी या दोघांनी आपण या गुन्ह्यातून अलगदरित्या निर्दोष सुटू असं म्हणत हरिश्चंद्र यांना चिडवलं होतं. त्यामुळे हरिश्चंद्र यांनी स्वतः कडील चाकू काढून दोघांवर न्यायाधीशाच्या उपस्थितच वार करण्यास सुरूवात केली.

या हल्ल्यात महेश आणि नंदेश या दोघांच्याही डोक्याला जबर जखमा झाल्या असून सध्या त्यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

हरिश्चंद्रला घटनास्थळीच अटक करण्यात आली असून भादंवि ३२६ (गंभीर दुखापत करणे) या कलमांतर्गत अटक केल्याची माहिती झोन ४ च्या डीसीपी एन. अंबिका यांनी दिली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा