दुर्दैवी! पोलीस दलात कोरोनाचा तिसरा बळी


दुर्दैवी! पोलीस दलात कोरोनाचा तिसरा बळी
SHARES

मुंबई पोलीस दलातील आणखी एका पोलीस कॉन्स्टेबलचा कोरोनाच्या संसर्गामुळं दुर्दैवी  मृत्यू झाला आहे. मुंबई पोलीस दलातील हा तिसरा कोरोना बळी आहे. यासंदर्भातील माहिती मुंबई पोलीस दलाने सोमवार २७ एप्रिल रोजी आपल्या ट्विटर हँडलवरून दिली आहे.

झुंज अपयशी

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव शिवाजी नारायण सोनावणे (५६) असं असून ते कुर्ला ट्राफिक डिव्हिजनमध्ये हेड काॅन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. मागील काही दिवसांपासून सोनावणे यांचा कोरोनाशी झुंज सुरू होती, परंतु ही झुंज अयशस्वी ठरली. मुंबई पोलीस दलाला हा तिसरा धक्का आहे. 

हेही वाचा- Coronavirus Updates: मृत पोलिसांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख, सरकारी नोकरी

याआधी दोन मृत्यू

याआधी वाकोला पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या ५७ वर्षांच्या पोलीस कर्मचाऱ्याचा नायर रुग्णालयात कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला होता. तर सुरक्षा आणि संरक्षण शाखेत कार्यरत असलेल्या ५३ वर्षीय हेड कॉन्स्टेबलचाही कोरोनामुळे मृत्यू झाला होता. या मृत्यूनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मृत पोलिसांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपये आणि एका वारसाला पोलीस दलात नोकरी देण्याची घोषणा केली.

१०७ पोलिसांना कोरोना

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्यसेवेतील कर्मचाऱ्यांप्रमाणेच मुंबईतील पोलीस अहोरात्र सेवा करत आहे. त्यामुळे अनेक पोलिसांनाही कोरोनाची लागण होत आहे. आतापर्यंत पोलीस दलातील २० अधिकारी आणि ८७  कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर ३ पोलीस अधिकारी व ४ कर्मचारी कोरोनामुक्त झाले आहेत.  

हेही वाचा- पोलिसांसाठी स्वतंत्र कोरोना दक्षता कक्ष, गृहमंत्र्यांची घोषणा

कोरोना दक्षता कक्ष 

दरम्यान, कोरोना संदर्भात प्रकृतीची कोणतीही तक्रार असलेल्या पोलिसाला वा अधिकाऱ्याला तातडीने उपचार मिळावेत याकरिता एक स्वतंत्र कोरोना दक्षता कक्ष निर्माण करण्यात आला आहे. मुंबईसाठी सहपोलीस आयुक्त नवल बजाज तर महाराष्ट्रासाठी अतिरिक्त महासंचालक संजीव सिंघल यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात येत आहे. जिल्हा स्तरावर देखील संबंधित पोलीस आयुक्त व जिल्हा पोलीस अधीक्षक हे अशा प्रकारचे कक्ष निर्माण करतील. तसेच मुंबईमध्ये दोन हॉस्पिटल हे पोलिसांसाठी राखीव ठेवण्यात येतील, अशी माहितीही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा