मुंबईत २ दिवसांत ६ हजार वाहनांवर कारवाई


मुंबईत २ दिवसांत ६ हजार वाहनांवर कारवाई
SHARES
चौथ्या लॉकडाऊननंतर काही ठिकाणी नागरीक खाजगी कार व दुचाकी घेऊन रस्त्यावर उतर होते. ही गर्दी रोखण्यासाठी वाहतुक पोलिसांनी गेल्या दोन दिवसात सहा हजार वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. सोमवारपासून मुंबईतील रस्त्यावर गाड्यांची गर्दी काहीशी वाढलेली दिसून आली. विशेष करून पूर्व व पश्चिम द्रुतगती मार्गावर बाहेर जाणा-या कार व दुचाकींची अधिक दिसून आली. त्यामुळे काही ठिकाणी वाहनांची गर्दीही दिसून आली.

 बिनकामाचे बाहेर पडण्यावर चाप बसवण्यासाठी पोलिसही ठिक ठिकाणी वाहनांची तपासणी करत असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येत असून गेल्या दोन दिवसात सहा हजार वाहने जप्त करण्यात आली. पश्चिम द्रुतगती मार्गावर दुपारी बोरीवलीच्या दिशेने जाणा-या मार्गिकेवर गर्दी पहायला मिळाली. विशेष करून अंधेरी व विलेपार्ले उड्डाणपूल परिसरात वाहनांची गर्दी दिसली. या परिसरात  पोलिसांनीही विविध ठिकाणी नाकाबंदी केली असून जीवनावश्यक सेवेचे पासची तपासणी केली जात आहे. याशिवाय दुचाकीवरून एकाहून जास्त व्यक्ती प्रवास करत असल्यास त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. दुस-या जिल्ह्यात जाणा-या अनेक गाडी चालकांकडे आवश्यक पासही नसल्याचे दिसून आले होते. मंगळवारी वाहतुक पोलिसांनी 4 हजार 294 वाहनांवर कारवाई केली. त्यात 1700 ऑटो रिक्षांचा समावेश आहे. याशिवाय 1150 दुचाकींवर, तर 1057 कारवर पोलिसांनी कारवाई केली. बुधवारी आणखी दोन हजार गाड्यांवर कारवाई करण्यात आली. यापूर्वी लॉकडाऊनच्या काळात वाहतुकीचे नियम तोडल्याप्रकरणी मुंबईत दोन लाख 9 हजार चालान जारी करण्यात आले आहेत. त्यात साडे नऊ कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

 विना हेल्मेट दुचाकी चालवण्याप्रकरणी 73 हजार 735 चालान, पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 36 हजार 248 चालान, अधिकृत परवाना सादर न केल्याप्रकरणी11 हजार 611 चालान, विना चालक परवाना गाडी चालवल्याप्रकरणी 6 हजार 354 चालान जारी करण्यात आले आहेत. असे एकूण दोन लाख 9 हजार 18 चालान लॉकडाऊनच्या काळात वाहतुकीचे नियम तोडल्याप्रकरणी जारी करण्यात आले आहेत. त्यातील दंडाची रक्कम 9कोटी 43 लाख 46 हजार 200 रुपये एवढी आहे. याशिवाय अवैधरित्या वाहतुक करणा-या टॅक्सी रिक्षांवरही मोठ्याप्रमाणात कारवाई करण्यात आली आहे. पण गेल्या दोन दिवसांत या कारवाईत  वाढ झाली आहे.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा