...'त्या' एका कॉलने पोलिस कंट्रोल रुमवर खळबळ

  Mumbai
  ...'त्या' एका कॉलने पोलिस कंट्रोल रुमवर खळबळ
  मुंबई  -  

  1993 साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाचा निकाल शुक्रवारी लागला. सात पैकी सहा आरोपींना विशेष टाडा न्यायालयाने दोषी ठरवले आणि अवघ्या मुंबईने सुटकेचा निःश्वास टाकला. पण या निकालाच्या अवघ्या काही तास आधी आलेल्या एका फोन कॉलने पुन्हा एकदा संपूर्ण पोलिस दलात खळबळ उडाली.

  स्वतःचे नाव मनोज राजपूर असे सांगणाऱ्या इसमाने विलेपार्लेमधील एस. व्ही. रोडवर ब्लास्ट घडवून आणणार असल्याचा कॉल पोलिसांना केला. विशेष म्हणजे आपण साधासुधा नसून नालासोपारा, मीरा रोड आणि उत्तर प्रदेशात तीन हत्या केल्याचे या कॉलरने पोलिसांना सांगितले आणि मनोजचा मोबाईल नंबर देखील दिला.


  हेही वाचा - 

  असा मिळाला 257 जीवांना न्याय...


  1993 मुंबई ब्लास्टच्या निकालाच्या दिवशी येणाऱ्या या धमकीकडे दुर्लक्ष करणे शक्यच नव्हते. म्हणून पोलिसांनी मनोज आणि ज्या फोनवरुन कंट्रोल रुमला फोन आला त्या क्रमांकाचा छडा लावण्यास सुरुवात केली. एकीकडे 1993 ब्लास्टचा निकाल आणि दुसरीकडे फोनवरुन आलेली धमकी यामुळे संपूर्ण मुंबईतील सुरक्षा वाढवण्यात आली होती.
  मात्र, अधिक तपासात हा फोन अभिमन्यू उर्फ आदित्य सिंह(27) नावाच्या तरुणाच्या फोनवरुन करण्यात आल्याचे समजले. या माहितीच्या आधारे, तत्काळ गुन्हेशाखा कक्ष 9 ने खारवरुन आदित्य सिंहला उचलले. त्याची चौकशी केली असता ही धमकी म्हणजे मनोजचा सूड उगवण्यासाठी रचलेले षड्यंत्र असल्याचे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आले.

  विलेपार्लेच्या दीपा बारच्या पाठीमागे मनोज राजपूत हा गॅम्बलिंग रॅकेट चालवतो. आदल्या दिवशी गुरुवारी आदित्य सिंहने मनोजला फोन केला होता आणि फोनवर दोघांची पैशांवरुन बाचाबाची झाली होती. त्याचा वचपा काढण्यासाठी आदित्य सिंहने ही खेळी केली, जी शेवटी त्याच्याच अंगलट आली. गुन्हे शाखा कक्ष 9 ने आदित्यला पकडून पुढील तपासासाठी जुहू पोलिसांच्या हवाली केले आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.