असा मिळाला 257 जीवांना न्याय...


असा मिळाला 257 जीवांना न्याय...
SHARES

मुंबईतल्या 1993 च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी शुक्रवारी विशेष टाडा न्यायालयाने अबू सालेम, गँगस्टर मुस्तफा डोसा, फिरोज खान, ताहीर मर्चेंट, करिमुल्ला शेख आणि रियाज सिद्दीकी या सहा आरोपींना दोषी ठरवलं तर, अब्दुल कय्युम नावाच्या आरोपीची निर्दोष सुटका केली. या सर्व आरोपींना 2003 ते 2010 या कालावधीत अटक करण्यात आली होती.

तब्बल 24 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर न्यायालयानं हा ऐतिहासिक निर्णय दिला आहे. 12 मार्च 1993 साली झालेल्या या भीषण बॉम्बस्फोटात 257 निष्पाप मुंबईकर मारले गेले होते. तर 700 हून अधिकजण जखमी झाले होते. 'आरडीएक्स' स्फोटकांचा वापर करुन झालेला हा जगातील पहिला दहशतवादी हल्ला होता.

उत्तर प्रदेशात 6 डिसेंबर 1992 मध्ये बाबरी मशीद पडण्यात आली. त्यानंतर उसळलेल्या दंगलीचा वचपा काढण्यासाठी 12 मार्च 1993 साली मुंबईत 12 बॉम्बस्फोट घडवण्यात आले. या साखळी स्फोटांमुळे संपूर्ण देश हादरला होता. त्यानंतर मुंबईत पुन्हा एकदा जातीय दंगली उसळल्या. या बॉम्बस्फोटांनंतर मुंबई पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरुवात केली. शस्त्र आणि स्फोटकांनी भरलेली स्कूटर तसेच मारुती गाडी सापडल्यानंतर या प्रकरणातील मेमन कुटुंबिय, तसेच दाऊद इब्राहिमचा सहभाग उघड झाला. त्यानंतर आरोपींची धरपकड करण्यास पोलिसांनी सुरुवात केली.

- 19 एप्रिल 1993 : विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी अभिनेता संजय दत्तला मुंबई विमानतळावर अटक

- 4 नोव्हेंबर 1993 : संजय दत्तसह 189 आरोपींविरुद्ध 10 हजार पानी आरोपपत्र सादर

- 19 नोव्हेंबर 1993 : तपास सीबीआयकडे सोपवला

- 10 एप्रिल 1994 : 26 आरोपींची टाडा विशेष न्यायालयाने सुटका केली

- 19 एप्रिल 1994 : टाडा विशेष न्यायालयात उरलेल्या आरोपींविरोधातील याचिकेवर सुनावणीला सुरुवात

- एप्रिल ते जून 1994 : आरोप निश्चिती

- 30 जून 1994 : आरोपी मोहम्मद जमील आणि उस्मान झांकनन माफीचे साक्षीदार

- 14 ऑक्टोबर 1994 : सर्वोच्च न्यायालयात अभिनेता संजय दत्तला जामीन मंजूर

- 23 मार्च 1996 : खटल्याची सुनावणी घेणारे न्या. जे. एन. पटेल यांची बदली

- 29 मार्च 1996 : पी. डी. कोदे यांची विशेष टाडा न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती

- ऑक्टोबर 2000 : 684 साक्षीदारांचा जबाब पूर्ण

- 9 ऑगस्ट 2001 : सरकारी पक्षाच्या युक्तीवादाला सुरुवात

- 18 ऑक्टोबर 2001 : सरकारी पक्षाचा युक्तीवाद संपला

- 9 डिसेंबर 2001 : बचाव पक्षाच्या युक्तीवादाला सुरुवात

- 22 आॅगस्ट 2002 : बचाव पक्षाचा युक्तीवाद संपला

- मार्च 2003 : मुस्तफा डोसाचा खटला वेगळा करण्यात आला

- सप्टेंबर 2003 : खटला संपला, न्यायालयाने निकाल राखून ठेवला

- 13 जून 2006 : पोर्तुगालवरुन प्रत्यार्पण करुन आणलेला गँगस्टर अबू सालेमचा खटला मूळ खटल्यापासून वेगळा करण्यात आला

- 10 ऑगस्ट 2006 : न्या. पी. डी. कोदे यांनी 12 सप्टेंबर ही निकालाची तारीख जाहीर केली

- 12 सप्टेंबर 2006 : निकालाला सुरुवात, मेमन कुटुंबातील चौघे दोषी सिद्ध, तर तिघांची निर्दोष सुटका. 12 दोषींना विशेष टाडा न्यायालयाने सुनावली फाशीची शिक्षा, तर 20 जणांना जन्मठेप सुनावली

- 31 जुलै 2007 : टाडा न्यायालयाने संजय दत्तला सहा वर्षांची शिक्षा सुनावली

- 20 ऑगस्ट 2007 : संजय दत्तचे सर्वोच्च न्यायालयात शिक्षेला आव्हान

- 1 नोव्हेंबर 2011: सर्वोच्च न्यायालयात संजय दत्तसह 100 दोषींच्या अपिलावर सुनावणीला सुरुवात

- 29 ऑगस्ट 2012 : अपिलावार सर्वोच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला

- 21 मार्च 2013 : टायगर मेमनचा भाऊ याकूबच्या फाशीवर सर्वाेच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब, तर फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या 10 जणांना जन्मठेप. जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या 18 पैकी 16 जणांची शिक्षा कायम, संजय दत्तला पाच वर्षांची शिक्षा, चार आठवड्यांच्या आत शरण येण्याचे निर्देश

- 21 जुलै 2015 : याकूबची शिक्षेवर पुनर्विचाराची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळाली

- 29 जुलै 2015 : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि महाराष्ट्राच्या राज्यपालांनी याकूबच्या दयेचा अर्ज फेटाळला

- 30 जुलै 2015 : सकाळी साडे सात वाजता नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात याकूबला फाशी

- 25 फेब्रुवारी 2016 : चांगल्या वर्तणुकीचा दाखला देत येरवडा कारागृहातून संजय दत्तची लवकर सुटका

- 29 मे 2017 : विशेष टाडा न्यायालयाने अबू सालेम, मुस्तफा डोसा यांच्यासह अन्य चौघांवरील अंतिम निर्णयाची तारीख जाहीर केली

- 16 जून 2017 : न्यायालयाने अबू सालेम, मुस्तफा डोसा, फिरोज खान, ताहीर मर्चेंट, करिमुल्ला शेख आणि रियाज सिद्दीकी या सहा आरोपींना दोषी ठरवलं, तर अब्दुल कय्युम नावाच्या आरोपीची निर्दोष सुटका केली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा