रेल्वे पटऱ्यांवरील पुनर्वसनाच्या प्रकल्पात घोळ, तिघांना अटक


रेल्वे पटऱ्यांवरील पुनर्वसनाच्या प्रकल्पात घोळ, तिघांना अटक
SHARES

रेल्वे पटऱ्यांवरील झोपड्यांच्या पुनर्वसनाच्या प्रकल्पात शासनाची फसवणूक करणाऱ्या तिघांना गुन्हे शाखा-२ च्या पोलिसांनी अटक केली आहे. संजय वाघ (४०), दीपक कासले (३६), हरेंद्र जैस्वाल (३८) अशी या आरोपींची नावे आहेत. पुनर्वसन प्रकल्पातील झोपड्यांची बनावट कागदपत्रं बनवून खोल्या लाटल्याचं पोलिस तपासात पुढे आल्यानंतर ही बाब उघडकीस आली.


वडाळा-कुर्लादरम्यानच्या झोपड्यांचं पुनर्वसन

मुंबईच्या हार्बर रेल्वे मार्गावर वडाळा-कुर्ला दरम्यान नवीन लाईन टाकण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून हाती घेण्यात आलं अाहे. हे काम सुरू करण्यापूर्वी पटऱ्यांवरील झोपड्यांचं पुनर्वसन करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला. या झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन एमएमआरडीएअंतर्गत केलं जाणार होतं. त्यासाठी एका एनजीओला सर्व्हे करण्याची जबाबदारी सोपावली होती.


शेवटच्या क्षणी यादीतून नाव गायब

तक्रारदार अन्ना दुराई यांच्या नावे या झोपडपट्टीमध्ये खोली होती. एनजीएओनं सादर केलेल्या सर्व्हेत त्याचं नाव होते. खोली मिळावी यासाठी अण्णा दुराईनं रिअल इस्टेट एजंट संजय वाघला १६ लाख रुपये दिले होते. मात्र एमएमआरडीएनं सादर केलेल्या शेवटच्या यादीत अण्णा दुराईच्या जागी मुमताज नावाच्या महिलेच्या नावावर ती खोली दाखवण्यात आली होती. आपली फसवणूक केल्याचं अण्णांच्या लक्षात आल्यानंतर त्यानं पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या गंभीर गुन्ह्याचा तपास बीकेसी पोलिसांनी गुन्हे शाखा-२ कडे सोपवला.


बनावट कागदपत्रांद्वारे लाटल्या ६ खोल्या

आरोपी संजय वाघ यानं त्या झोपड्यांमध्ये बनावट कागदपत्र सादर करून पत्नी, बहीण, मेव्हणा, मित्र आणि स्वतःच्या नावाने अशा ६ खोल्या मिळवल्याचे पोलीस तपासात उघड झाले अाहे. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक केली. यानंतर पोलिसांनी वडाळा-चुन्नाभट्टी या दुसऱ्या प्रकल्पातही अशाप्रकारे झोपड्या लाटल्या आहेत का ? हे पाहण्यासाठी मानखुर्दच्या ललूभाई कंपाऊडमध्ये नागरिकांना देण्यात आलेल्या खोल्यांची कागदपत्रे तपासली. त्यावेळी या गुन्ह्यातला दुसरा आरोपी बांधकाम व्यावसायिक दीपक कासले (३६) याने राम सुमद यादव या बोगस व्यक्तीला उभं करून घर मिळवलं. कालांतराने ती खोली त्याने कासलेला विकल्याचे दाखवले होते. त्यानुसार पोलिसांनी कासलेला ही अटक केली आहे.


शासनाची फसवणूक

गुन्ह्यातील तिसरा आरोपी हरेंद्र जैस्वाल यानंही खोली मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रं सादर केल्याचं पुढे आल्यानं पोलिसांनी त्याला अटक केली आहे. बनावट कागदपत्रं सादर करून शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या या आरोपींविरोधात पोलिसांनी भा.द.वि. ४१९, ४२०, ४३४, ४६५, ४६६, ४६८, ४७१, ४७४ अंतर्गत गुन्हा नोंदवल्याची माहिती गुन्हे शाखा-२ च्या पोलिसांनी दिली आहे.


हेही वाचा -

प्रेयसीला दिल्या उंदीर मारण्याच्या गोळ्या, संतप्त प्रियकराचा पराक्रम

भाजीवाला झाला करोडपती! लुबाडले कोट्यवधी रूपये

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा