महिलेच्या पार्श्वभागात सापडली आठ सोन्याची बिस्किटे


महिलेच्या पार्श्वभागात सापडली आठ सोन्याची बिस्किटे
SHARES

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोने तस्करीच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुंबई विमानतळावरून एका महिलेच्या पार्श्वभागात लपवलेली आठ सोन्याची बिस्किटे सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रत्येकी 10 तोळ्याच्या या सोन्याच्या बिस्किटांची किंमत 27 लाखांच्या घरात आहे. मोहांना जेम्स (32) असं या महिलेचे नाव असून ती तामिळनाडूची रहिवासी आहे. गुरुवारी रात्री दुबईवरून मुंबईला आलेल्या मोहानाची हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतलेल्या झडतीत 928 ग्रॅम वजनाची आठ सोन्याची बिस्किटे सापडली.

हवाई गुप्तचर विभागाने मोहाना आणि तीन महिलांसह एका व्यक्तीला सोन्याची तस्करी तसेच परकीय चलन बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. जुलेका उस्मान मन्सुरी (47) नावाच्या महिलेकडून हवाई गुप्तचर विभागाने 18 हजार अमेरिकन डॉलर जप्त केले आहेत. या डॉलरची किंमत साडेअकरा लाखांच्या घरात असून कस्टमची नजर चुकवण्यासाठी तिने ते पुस्तकांमध्ये लपवून आणले होते. मुंबईच्याच असलेल्या तब्बसूम आरिफ शेख (31) कडून हवाई गुप्तचर विभागाने 402 ग्रॅम वजानाचे 12 लाख किमतीचे दागिने जप्त केले आहेत. हे दागिने तिने आपल्या अंतरवस्त्रांच्या आत लपवल्याचा दावा एआययूने केला आहे.

याचबरोबर रियाधवरून आलेल्या अब्दुल कादिर जैलानी (53) कडून 10 लाख किमतीची तीन सोन्याची बिस्किटे, तर केनियाची नागरिक असलेल्या फातिमा शेख हसनकडून हवाई गुप्तचर विभागाने 610 ग्रॅम वजनाचे 18 लाख किमतीचे दागिने जप्त केले आहेत. या सगळ्यांनी आर्थिक फायद्यासाठी सोन्याची तस्करी केल्याचा दावा हवाई गुप्तचर विभागाकडून करण्यात आला आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा