टेम्पोत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

 Govandi
टेम्पोत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

गोवंडीच्या शिवाजीनगर परिसरात शुक्रवारी रात्री पार्क केलेल्या एका टेम्पोत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. याच परिसरात राहणारे शहानवाज शेख हे त्यांचा टेम्पो घेऊन शुक्रवारी संध्याकाळी मानखुर्द परिसरात गेले होते. तासाभरात पुन्हा शिवाजीनगर येथे आल्यानंतर त्यांनी त्यांचा टेम्पो सेक्टर 'ई' येथे उभा केला होता. काही वेळानंतर पुन्हा ते टेम्पोजवळ आले असता त्यांना टेम्पोत अज्ञात व्यक्ती झोपलेला दिसला. 

एखादा दारुड्या दारू पिऊन टेम्पोत झोपलेला असावा, असा त्यांचा अंदाज होता. त्यामुळे त्यांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो न उठल्याने त्यांनी ही बाब शिवाजीनगर पोलिसांना सांगितली. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी तो व्यक्ती मृत असल्याचे सांगत मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवला. पोलिसांच्या तपासात मृत व्यक्ती याच परिसरातील असल्याचे समोर आले असून तो गर्दुल्ला असल्याची माहिती काही रहिवाशांनी पोलिसांना दिली आहे. शवविच्छेदन अहवालात देखील त्याचा मृत्यू नशेमुळेच झाल्याचे शिवाजीनगर पोलिसांनी सांगितले.

Loading Comments