लिफ्टच्या ४० फूट खड्ड्यात पडला, तरीही वाचला!


लिफ्टच्या ४० फूट खड्ड्यात पडला, तरीही वाचला!
SHARES

गोरेगावच्या दिंडोशी येथील एका बिल्डिंगच्या लिफ्टच्या ४० फूट खड्ड्यात पडलेल्या १० वर्षीय मुलाला पोलिस उपायुक्त विनय राठोड यांनी जीवनदान दिल्यामुळे त्यांचे कौतुक होत अाहे. खोल खड्ड्यात पडलेल्या या मुलाला विनय राठोड यांनी अापल्या खांद्यावरून नेत रुग्णालयात दाखल केलं. त्यांच्या या प्रसंगावधानामुळे मुलाची प्रकृती स्थिर असल्याचं रुग्णालय प्रशासनानी सांगितलं. मुलाला वाचवतानाचा पोलिस उपायुक्त राठोड यांचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत अाहे.


अचानक गायब झाला दृश्य

गोरेगावच्या डीबी काॅम्प्लेक्समध्ये शुक्रवारी धुलिवंदन सणानिमित्ता अानंदाचे वातावरण असताना चौथीत शिकणारा दृश्य तोडी अचानक गायब झाल्याने खळबळ उडाली. सकाळी ११ वाजता धुलिवंदनासाठी दृश्य घराबाहेर पडला. मात्र दुपारी १.३० वाजल्यानंतर तो दिसेनासा झाला. मित्रांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. अखेर मित्रांनी दृश्यच्या घरच्यांना तो हरवल्याचे कळवले. अखेर पालकांनी दुपारी ४ वाजता दिंडोशी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपायुक्त विनयकुमार राठोड स्वतः घटनास्थळी दाखल झाले.



अखेर पोलिसांनी शोधून काढले

पोलिसांनी दृश्यच्या मित्रांजवळ विचारपूस केली असता, ही मुले इमारतीच्या चौथ्या मजल्यापर्यंत असलेल्या पार्किंगच्या जागेत खेळत असल्याचे समजले. पोलिसांनी पार्किंगमध्ये शोध घेतला असता, एका अडगळीच्या ठिकाणी रिकामी जागा दिसली. त्याच ठिकाणच्या मातीवर लहान मुलाच्या चप्पलचे ठसेही दिसत होते. या जागेतूनच दृश्य खाली पडल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवत तळमजल्यात त्याचा शोध घेतला. अखेर तिथे बेशुद्ध अवस्थेत दृश्य अाढळून अाला.


पोलिस उपायुक्तांनी खांद्यावरून उचलून नेले दृश्यला

क्षणाचाही विलंब न करता पोलिस उपायुक्त विनयकुमार राठोड यांनी मुलाला खांद्यावर उचलून रुग्णालयात नेले. सुदैवाने ४० फूटांवरून पडूनही दृश्यच्या डोक्याला गंभीर मार लागला नव्हता. तातडीने रुग्ण्लयात दाखल करून दृश्यवर उपचार केल्यामुळे त्याला दुसरे जीवनदानच मिळाले अाहे. या सर्व घटनेची माहिती सोशल मीडियावरून वाऱ्यासारखी पसरली. एकाने हे चित्रीकरण केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला. त्यानंतर विनय राठोड यांचे सर्वत्र कौतुक होत अाहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा