
डॉक्टर पेशाला साजेल असेच असावेत आणि तशी सेवाही दिली पाहिजे, अशी अपेक्षा सर्वांकडून करण्यात येते. सध्या याच अपेक्षांची पूर्ती मुंबईतील अनेक डॉक्टर केरळमध्ये करताना दिसत आहेत. त्यामुळे ते केरळवासीयांसाठी देवदूत ठरले आहेत.
मोडकी घरं, जागोजागी साचलेलं पाणी, रस्त्यावर आलेला संसार, आणि बेघर झालेली हजारो कुटुंब अशी दयनीय परिस्थिती सध्या केरळची झाली आहे. साचलेल्या पाण्यात राहिल्यानं तसंच दूषित पाण्याच्या सेवनानं नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात आरोग्याच्या तक्रारी उद्भवल्या आहेत.
पाणी साचल्यानं लेप्टो, मलेरिया, डेंग्यू, टायफॉईड यांसारखे अनेक साथीच्या आजारांची साथ पसरण्याची शक्यता आहे. मात्र साथीच्या आजारांचा जास्त संसर्ग होऊ नये यासाठी मुंबईसह पुण्यातील १०० डॉक्टरांचं पथक केरळमध्ये दाखल होत आरोग्य सेवा पुरवण्यास सुरुवात केली आहे.
सध्या या १०० जणांच्या पथकानं तीन विविध ग्रुप केलं असून प्रत्येक ग्रुपमध्ये ३० डॉक्टर सेवा पुरवत आहेत. सध्या एनाकुलम, पटनामित्तम, त्रिचुर या तीन जिल्ह्यात आरोग्य शिबीर राबवण्यात येत असून बालवाडी आणि अंगणवाडीत आरोग्य सेवा देण्यात येत आहेत.
या प्रत्येक ठिकाणी चार ते पाच ओपीडीला सुरुवात करण्यात आली असून आतापर्यंत ५०० ते ६०० नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. यातील ७० टक्के रुग्णांना ताप असून त्यासोबतच श्वसनासंबंधी व त्वचेसंबंधीचा त्रासही काही नागरिकांना होतं आहे.या पुराच्या पाण्यामुळे घरात फक्त आणि फक्त चिखल झाला आहे.
पाण्याचा उपसा कसा करायचा? हा प्रश्न इथल्या नागरिकांपुढे आहे. त्यासोबत या सर्वांचं पुनर्वसन कसं होणार? हा देखील गंभीर प्रश्न आहे. काहीच सुविधा सध्या या परिसरात उपलब्ध नाही. दरम्यान केरळच्या नागरिकांवर उपचार करताना डॉक्टरांना भाषेमुळे मोठ्या प्रमाणात अडथळे येत आहेत. त्यामुळे त्या लोकांना कशा पद्धतीन गोळ्या घ्यायच्या किंवा कशा पद्धतीने उपचार करायचे आहेत हे सांगण्यासाठी डॉक्टरांना ट्रान्सलेटरची गरज पडत आहे.

महाराष्ट्रातील डॉक्टर्स चार दिवस पुरतील एवढी औषधं केरळमध्ये घेऊन दाखल झाल्यानं ही औषधं कमी पडतील की काय? अशी भीती डॉक्टर्स व्यक्त करत आहेत.
सुविधाच नसल्याने आय.व्ही फ्ल्यड्स लावण्यासाठी कठीण जात आहे. रुग्णालय बंद असल्याकारणानं रुग्णांना दाखल करून घेणंही कठीण आहे. २६ लाख घरांना वीजपुरवठा होत नाही.
सध्या आम्ही तीन जिल्ह्यात आरोग्य शिबीर भरवली असून जवळपास प्रत्येक ठिकाणी ५०० नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. आतापर्यंत ७० टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण हे तापाचे आहेत. या सर्वांना औषधोपचार देण्यात आले असून त्यांना गोळ्या घेण्यासाठी मिनिरल वॉटरही देण्यात आलं आहे.
- डॉ. आकाश माने, डॉक्टर, जेजे रुग्णालय
सध्याच्या पूर परिस्थितीमुळे केरळमध्ये डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया, डायरिया, टायफॉईड, लेप्टोस्पायरोसिस, कॉलरा, कावीळ, ताप यासारख्या साथीच्या रोगाची साथ पसरण्याची भिती आहे. त्यामुळं आम्ही या सर्व रुग्णांना अॅंटिबायोटिक दिली आहेत, अशीही माहिती डॉ. माने यांनी दिली
केरळला मदतीचा हात म्हणून मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासानेही केरळ पूरग्रस्तांसाठी एक कोटीची मदत जाहीर केली आहे. तसंच डबेवाल्यांच्या पेपर अँड पार्सल व रोटी बँकच्या मदतीनं एक हजार किलो तांदुळ, प्रथमोपचारचं साहित्य पाठवण्यात आलं आहे.
हेही वाचा -
