पोलीस भरती लेखी परीक्षेतील डमी उमेदवारांना अटक


पोलीस भरती लेखी परीक्षेतील डमी उमेदवारांना अटक
SHARES

मुंबई पोलीस भरतीच्या शारिरीक चाचणी दरम्यान झालेल्या घोटाळ्यानंतर आता लेखी परीक्षेत देखील उमेदवारांनी गोंधळ घातल्याचे समोर आले आहे. मुंबई पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेदरम्यान डमी उमेदवार बसवल्याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.

बुधवारी मुंबईत विविध केंद्रांवर पोलीस भरतीची लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत गिरगावसह अंधेरी परिसरात अनेक उमेदवारांनी आपल्या जागी डमी उमेदवार उभे केल्याचे उघड झाले आहे. सहार येथे अनिल भिसे (24) नावाच्या उमेदवाराने आपल्या जागी संतोषलाल छोटे (25) नावाच्या तरुणाला उभे केले होते. या प्रकरणी पोलिसांनी प्रल्हाद नागलट (25) नावाच्या दलालाला देखील अटक केली आहे. संतोषलाल छोटे बनावट आधार कार्डाच्या साहाय्याने ही लेखी परीक्षा देत होता. या तिघांनाही न्यायालयाने 22 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

चर्नीरोड येथील सेंट टेरेसा हायस्कूलमध्ये लेखी परीक्षा देत असताना आणखी एका डमी उमेदवाराला पोलिसांनी अटक केली आहे. सज्जन मोतीलाल सतवन (23) असे डमी उमेदवाराचे नाव असून, तो मूळ उमेदवार अनिल ढगे याच्या जागी लेखी परीक्षा देत होता. अंमिलचा शोध सध्या पोलीस घेत आहेत.

सर्व आरोपी औरंगाबादचे -
पकडण्यात आलेले सगळे आरोपी औरंगाबादचे असल्याने यामागे कोणती टोळी कार्यरत आहे का? याचा तपास करत असल्याची माहिती पोलीस प्रवक्त्या डीसीपी रश्मी करंदीकर यांनी दिली.

भांडूप येथेही एका उमेदवाराला मोबाइल फोनसह अटक करण्यात आली. गणेश राणे (२५) याने त्याच्या बनियनमध्ये मोबाइल लपवला होता आणि इयरफोनची वायर शर्टाच्या शिलाईमधून कॉलरपर्यंत लपवली होती. याआधी पार पडलेल्या शरिरीक चाचणी परिक्षेदरम्यान उमेदवारांनी उंची वाढवण्यासाठी केसांना च्युईंगम लावणे, विग लावणे, डोक्याच्या केसात क्लिप लावणे तसेच पायाखाली पाच रुपयांचे नाणे ठेवणे असे प्रकार केले होते.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा