पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरण : नीरव मोदीच्या घरी ईडीचे छापे


पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरण : नीरव मोदीच्या घरी ईडीचे छापे
SHARES

पंजाब नॅशनल बँकेला खोटे हमीपत्र देऊन ११ हजार ४०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी हिरे व्यापारी नीरव मोदीचं कार्यालय आणि घर अशा ९ ठिकाणी अंमलबजावणी संचालनालय (ईडी)ने शुक्रवारी सकाळी छापेमारी केली. ठराविक खातेदारांना फायदा पोहोचवण्यासाठी झालेल्या या व्यवहारांचा शोध बँकेने घेतल्यानंतर हा घोटाळा उघडकीस आला आहे. या घोटाळ्यातील सर्व व्यवहार बँकेच्या मुंबईतील शाखेतून झाले असून बँकेच्या २ अधिकाऱ्यांना यापूर्वीच सीबीआयने ताब्यात घेतलं होतं. 


पीएनबीचे शेअर्स कोसळले

पंजाब नॅशनल बँकेत झालेल्या घोटाळ्याची माहिती सर्वत्र पसरल्यानंतर शेअर बाजारातील पीएनबीचे शेअर्स ५.७ टक्क्यांनी कोसळले. कर्जवितरणाच्या बाबतीत पंजाब नॅशनल बँक ही देशातली दुसऱ्या क्रमांकाची बँक असून एकूण मालमत्तेच्या बाबतीत चौथ्या क्रमांकाची बँक आहे. याच संधीचा फायदा घेऊन ज्वेलर्सचा व्यवसाय असणाऱ्या देशातील श्रीमंतांपैकी एक असलेल्या नीरव मोदीने बनावट हमीपत्र सादर करत, परदेशातील काही जणांना मोठी रक्कम कर्ज म्हणून मिळवून दिली. 

या बँकेतील घोटाळ्याचा संबंध उद्योगपती नीरव मोदी याच्याशी असल्याची माहिती पुढे येताच सीबीआयसह 'ईडी'ने नीरव मोदीविरोधात फास आवळण्यास सुरुवात केली. शुक्रवारी सकाळी ईडीने नीरवच्या कफ परेड येथील घरी आणि त्याच्या कार्यालयावर छापेमारी करत काही कागदपत्र ताब्यात घेतली. काही दिवसांपूर्वीच पंजाब नॅशनल बँकेने नीरव मोदी आणि इतर काही जणांविरोधात ४.४ कोटी डॉलरच्या घोटाळ्याप्रकरणी तक्रार नोंदवली होती. 


कोण आहे नीरव मोदी?

४७ वर्षीय नीरव मोदी भारतातील एका नामांकित ज्वेलर्स व्यावसायिकांपैकी एक आहे. नीरवच्या वडिलांचा पूर्वीपासूनच ज्वेलर्सचा व्यवसाय होता. पुढे नीरवनेही या व्यवसायात हातभार लावला. त्यानंतर तो कुटुंबीयांसह बेल्जियमला गेला. मात्र तिथं व्यवसायात नुकसान झाल्यानंतर मोदी कुटुंबाला बेल्जियम सोडून पुन्हा भारतात यावं लागलं. मुंबईत आल्यावर नीरव मोदी त्याचा मामा मेहूल चोकसी यांच्याकडे हिरे व्यापाराचं काम शिकला. कमी वयातच नीरव मोदी डिझाईन क्षेत्राकडे आकर्षित झाला. त्यानंतर त्याने हिरे व्यवसायात आपला जम बसवला. पंजाब नॅशनल बँकेला ११ हजार ४०० कोटी रुपयांचा गंडा घालणारा नीरव मोदी आता सीबीआय तसेच 'ईडी'च्या रडारवर आहे.



हेही वाचा-

पीएनबीत ११ हजार कोटींचा घोटाळा, गुंतवणूकदारांचे ३ हजार कोटी पाण्यात



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा