मॉलमधील एस्केलेटरमध्ये चिमुकल्याची तीन बोटं तुटली

आई-वडिलांचे लक्ष गेल्यानंतर ते त्याच्या मदतीसाठी धावणार तोच चिन्मयची तीनही बोटं एस्केलेटरमध्ये अडकून हातावेगळी झाली होती

मॉलमधील एस्केलेटरमध्ये चिमुकल्याची तीन बोटं तुटली
SHARES

सध्या आपल्याला सगळीकडेच सरकते जिने (एस्केलेटर) पाहायला मिळतात. अनेकांना जिने चढण्याचा त्रास असतो अशावेळी एस्केलेटर हे फारच आरामदायी वाटतात. मात्र, हेच एस्केलेटर कधीकधी जीवघेणे देखील ठरू शकतात. मुलुंडमधील एका माॅलमधील एक्सलेटरमध्ये बोटं अडकल्याने दीड वर्षाच्या चिमुकल्याला आपली बोट गमवावी लागल्याची घटना पुढे आली आहे. नुकतेच अंधेरी रेल्वे स्थानकावर एक्सेलेटर उलटा फिरल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर १७ सरकत्या जिन्यांची दुरुस्ती करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वे प्रशासनाने घेतला.मुलुंडच्या आर माॅलमध्ये राजीवडे कुटुंब त्याच्या दीड वर्षाच्या चिन्मय राजीवडेसह खरेदीला आले होते. खरेदी झाल्यानंतर हे तिघे देखील पहिल्या माळ्यावरून सरकत्या जिन्याच्या साहाय्याने खाली उतरत होते. त्यावेळी आईवडिलांच्या नकळत चिन्मयचा हाताची बोट एक्सेलेटरच्या जिन्यात मध्ये अडकली. यावेळी चिन्मय जोरात ओरडला. आई-वडिलांचे लक्ष गेल्यानंतर ते त्याच्या मदतीसाठी धावणार तोच चिन्मयची तीनही बोटं एस्केलेटरमध्ये अडकून हातावेगळी झाली होती. वेदनांनी असह्य झालेल्या चिन्मयच्या कुटुंबियांनी तातडीने जवळील  फोर्टिस रुग्णालयात दाखल केलं. मात्र पुढील उपचारासाठी चिन्मयला परळच्या के.ई. रुग्णालयात हलवण्यात आले. चिन्मयच्या हातांच्या नसा दबल्या गेलेल्या असल्यामुळे ही तीनही बोटं पुन्हा डॉक्टरांना जोडता आली नाहीत.मूळात एक्सेलेटरसारख्या जिन्याना देखील सेन्सर्स असतात. या सेन्सर्समुळे एखादा अडथळा आलाच तर हे सरकते जिने लगेच बंद होतात. सोबतच अशा सरकत्या जिन्यांच्या जवळ एक अटेंडंट असणं देखील तितकंच गरजेचं असतं. मात्र मुलुंडमधील दुर्घटनेत त्याचा अभाव जाणवला. दरम्यान यासंदर्भात अद्यापपर्यंत मुलुंड पोलीस ठाण्यात कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. परंतु या घटनेमुळे हे सरकते जिने किती जीवघेणे ठरू शकतात आणि पालकांनी अशा ठिकाणी आपल्या मुलांकडे लक्ष ठेवणं किती गरजेचा आहे हे स्पष्ट होत आहे.

 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा