नवजात मुलांची विक्री करणा-या टोळक्याचा पडदाफाश


नवजात मुलांची विक्री करणा-या टोळक्याचा पडदाफाश
SHARES

पैशांच्यासाठी जन्मलेल्या मुलांची विक्री केल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने तीन महिलांसह चौघांना अटक केली आहे. प्राथमिक तपासात आरोपींनी पुणे, दादर व धारावी येथे दोन मुलगे व एका मुलीची विक्री केल्याचे निष्पन्न झाले आहे. अटक आरोपींमध्ये दोन मातांचा समावेश आहे.

हेही वाचाः- मुंबईत कावळे, कबुतरांच्या मृत्यूत वाढ

पैशांसाठी एक टोळके नवजात मुलांची विक्री करत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष-१च्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी रुकसार शेख(२८) हिच्या प्रसुतीबाबत सांताक्रुझ येथील प्रसिद्ध रुग्णालयात माहिती घेतली असता तिने १डिसेंबरला तेथे एका मुलाला जन्म दिल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी याबाबत तपासणी केली असता शेख हिने तो मुलगा पुण्यात दीड लाख रुपयांना विकल्याचे स्पष्ट झाले. रुपाली शर्मा(३०) हिच्या मदतीने ही विक्री करण्यात आल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेऊन चौकशी केली असता शेखने दीड वर्षापूर्वीही एका मुलीला जन्म देऊन ६० हजार रुपयांना दादरमध्ये विकली होती. तसेच अशाच पद्धतीने शहाजहान जोगिलकर(१९) हिने २०१९ मध्ये एका मुलाला जन्म दिला होता. त्याचाही शर्माच्या माध्यमांतून ६०हजार रुपयांना धारावी येथे विकण्यात आल्याचे निष्पन्न झाले. हे बाळ संजय पंडल(४४ ) याने खरेदी केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने शहाजहान व संजय या दोघांनाही अटक केली. आरोपींविरोधात ३७०(४), ३४अंतर्गत गुन्हा दाखळ करण्यात आले आहे.

हेही वाचाः- मुंबईत सोमवारपासून शाळा सुरु होणार?

याप्रकरणी तपासासाठी एक पथक पुण्यात रवाना झाले असून शेख यांनी विक्री केलेल्या मुलाबाबतची माहिती घेण्याचे काम सध्या सुरू आहे. याशिवाय या टोळक्याने आणखी मुलांचीही अशाच पद्धतीने विक्री केली असल्याचा संशय आहे. त्यासाठी आरोपींची चौकशी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. गरीब महिलांना गाठून पैशांसाठी मुलांची विक्री करणा-या या टोळीत आणखी सदस्यही असल्याची शक्यता असून पोलिस त्याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा