नितेश राणेंविरोधात गुन्हा दाखल


नितेश राणेंविरोधात गुन्हा दाखल
SHARES

मुंबईच्या सांताक्रूझ पोलीस ठाण्यात नितेश राणे यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. एका हॉटेल व्यावसायिकाने हॉटेल सुरू ठेवण्यासाठी नितेश राणेंनी खंडणी मगितल्याचा आणि खंडणी देणे थांबवताच गुंड पाठवून हॉटेल बंद पाड़ल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी सांताक्रूज पोलिसांनी मोईन शेख (36) आणि मोहम्मद अंसारी (36) या दोघांना अटक केली आहे. तर मुख्य आरोपी नितेश राणे अद्याप बेपत्ता आहेत. गुन्हा दाखल झालेले नितेश राणे हे आमदार नितेश राणेच असल्याची चर्चा सुरु झाली आहे. आता गुन्हा दाखल झालेले हे नितेश राणे नक्की कोण? याचा खुलासा तर प्रत्यक्ष अटक झाल्यानंतरच होऊ शकेल. 

जुहू तारा रोडवर हितेश केसवानी आणि निखिल मिरानी नावाच्या दोघा व्यावसायिकांनी 'एस्टेला' नावाचे रेस्टॉरंट सुरू केले. या हॉटेलच्या अंतर्गत सुशोभिकरणाचे काम नुकतेच सुरु झाले होते. त्यावर नितेश राणे यांची नजर पडली. 'माझ्या परिसरात माझ्या परवानगी शिवाय हॉटेल सुरुच कसे केले?' असा प्रश्न नितेश राणे विचारू लागले. त्यानंतर ते जबरदस्तीवर आले. या दोन्ही व्यावसायिकांना दमदाटी करून त्यांनी अगदी तुटपुंज्या रकमेत आपल्या एका हस्तकाला या हॉटेल व्यवसायात 50 टक्क्यांचे भागीदार केले.

डिसेंबर 2016 साली हे रेस्टॉरंट सुरू देखील झाले. पण सुरुवातीलाच तोटा झाल्याने त्यांच्या हस्तकाने आपले पैसे काढून घेत थेट नितेशशी व्यवहार करण्यास सांगितले. हॉटेल चालू देण्याच्या बदल्यात नितेशनी दर महिन्याला 10 लाख रूपयांची मागणी केली आणि पैसे न दिल्यास हॉटेल तर चालू देणार नाहीच, पण तुमचं देखील काही खरं नाही असं बजावल्याचं हितेश केसवानी यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

जानेवारी 2017 ते मे 2017 पर्यंत केसवानी यांनी पैसे दिले. पण जून महिन्यापासून हे शक्य नसल्याचं त्यांनी नितेशला सांगितलं. हे ऐकताच नितेश यांचा पारा चढला. त्यांनी शिवीगाळ केली. त्यानंतर गुरुवारी रात्री साडे दहा वाजता मोईन शेख आणि मोहम्मद अंसारी हॉटेलमध्ये दाखल झाले आणि त्यांनी आरडाओरड करून, शिवीगाळ करून, तोडफोड करण्याची धमकी देऊन हॉटेल बंद पाडले.

या प्रकरणी हॉटेल व्यावसायिकाच्या तक्रारीवरून सांताक्रूज पोलिसांनी या दोघांना अटक केली अाहे. आता नितेशला पोलीस कधी अटक करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

एस्टेला हॉटेल माझ्या राहत्या घरापासून जवळच आहे. तिथे अतिशय कर्कश आवाजात संगीत वाजवण्यात येते. या आवाजामुळे आम्हीच नव्हे तर इतर रहिवासीही त्रस्त आहेत. रात्री उशिरापर्यंत हे हॉटेल सुरू असते. खंडणीचा आरोप खोटा आहे. हॉटेल मालकाकडून केलेले आरोप हे मला बदनाम करण्याचं षडयंत्र आहे. पोलिसांनी कारवाई का केली नाही याचे कारण द्यावे.

- नितेश राणे, आमदार, काँग्रेस

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा