पोलीस होण्याआधीच उमेदवारांना भुरट्या चोरांकडून होतोय त्रास

 Vikroli
पोलीस होण्याआधीच उमेदवारांना भुरट्या चोरांकडून होतोय त्रास

मुंबईमध्ये पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांचं सामान, बॅगा,पाकिटे चोरीला जात असल्याची घटना समोर आली आहे. यामुळे भरतीसाठी खेड्यापाड्यांतून आलेले उमेदवार त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे या उमेदवारांच्या बॅगा,पाकिटे चोरी होण्याच्या घटना इतक्या वाढल्यात की, नेमक्या बॅगा ठेवायच्या तरी कुठे, असा प्रश्न या उमेदवारांना पडला आहे. भुरट्या चोरांची मजल इतकी वाढलीय की, त्यांनी थेट पोलीस केंद्रात घुसून उमेदवारांच्या बॅगा आणि पाकिटे लंपास करण्याचा सपाटा लावलाय. विशेष म्हणजे आपला ऐवज हरवल्याची तक्रार नोंदविणाऱ्या उमेदवारांची कुठलीही नोंद न घेता पोलीस त्यांच्या हाती गहाळ पत्र देत आहेत. त्यामुळे दाद तरी कुणाकडे मागायची, असा प्रश्न या उमेदवारांनी उपस्थित केला आहे.
मुंबईतल्या विक्रोळी ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील मैदानी चाचणी केंद्रावर चाचणीसाठी खेड्यापाड्यांतून उमेदवार आले आहेत. एकीकडे अपुऱ्या सेवा आणि त्यातच आता बॅगा चोरीला जात असल्यामुळे उमेदवार त्रस्त झाले आहेत.

इथं बॅग ठेवण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. मी चाचणीसाठी बॅग ठेवून गेलो होतो. जेव्हा परत आलो तर माझ्या बॅगमधील मोबाईल आणि पाकीट गायब होते. याबाबत मी तक्रार दिली आहे.
अोंकार आंबेडकर, उमेदवार

मुंबईत 17 हजार पदांसाठी पावणे दोन लाख उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. पोलीस प्रशासन मात्र सारं काही अालबेल असल्याचं सांगत आहेत. पोलीस होण्याआधीच या उमेदवारांना चोरांचा सामना करावा लागतोय. यासारखे दुसरे दुर्दैव ते काय ? निदान आत्ता तरी पोलीस प्रशासनाने डोळे उघडून अशा भुरट्या चोरांना गजाआड करण गरजेचं आहे.

Loading Comments