कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला अश्लील शिव्या देऊन हक्कभंगाची धमकी देणारा शिवराळ आमदार रमेश कदम याच्याविरोधात नागपाडा पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम 186, 189, 504, 506 (2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी केलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्याप्रकरणी सध्या भायखडा तुरूंगात असलेला आरोपी आ. रमेश कदम याला वैद्यकीय तपासणीसाठी जे. जे. रुग्णालयात नेण्यात येत होते. त्यावेळेस त्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांना अतिशय अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. एवढेच नव्हे, तर त्यांच्यावर लाच घेण्याचा आरोप करत हक्कभंग आणण्याची धमकीही त्याने दिली होती. रमेश कदमचा हा अवतार बघून पोलिसांनी स्वतः त्याचा व्हिडीओ चित्रित केला होता. कदमच्या या कृत्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चांगलाच गदारोळ माजला.
सरकारी कामात अडथळा आणून कर्तव्य बाजावणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला धमकी दिल्याप्रकरणी कदम याच्याविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच व्हिडीओत दिसणाऱ्या सात पोलीस हवालदारांचा जाबाबही याप्रकरणी नोंदवण्यात आल्याची माहिती, मुंबई पोलीस प्रवक्त्या रश्मी कदम यांनी दिली. कदमच्या या कृत्याने त्याला जामीन मिळण्यात देखील मोठा अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.