मुंबईत भस्मसात...

मुंबई - सोमवारी मुंबईमध्ये आगीचं तांडव पाहायला मिळालं. एकाच दिवशी मुंबईमध्ये आगीच्या दोन घटना घडल्या. मस्जिद बंदर येथील झोपडपट्टीला संध्याकाळी पाचच्या सुमारास भीषण आग लागली. ही झोपडपट्टी मध्य रेल्वेच्या मस्जिद बंदर स्थानकाला लागूनच आहे. झोपडपट्टी रेल्वे रूळांच्या खूपच जवळ असल्याने आणि आगीची तीव्रता जास्त असल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. याचा परिणाम रेल्वेमार्गावर देखील झाला. गाड्या साधरणत: अर्धा तास उशिराने धावत होत्या. या आगीत जवळपास 20 झोपड्या जळून खाक झाल्या. तर पाच जण गंभीर जखमी झाले असून यात दोन मुलांचाही समावेश आहे. अग्निशमन दलाच्या 12 गाड्या आणि 8 पाण्याचे टँकर आग विझवण्यासाठी घटना स्थळी दाखल झाले होते. अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश आले.

तर दुसरी आग मुलुंड येथील जे.एन. रोड परिसरातील एका वडापावच्या गाडीला लागली. सोमवारी संध्याकाळी 6.30 च्या सुमारास स्टोव्हमध्ये भडका उडाल्याने ही आग लागली. अग्निशमन दलाच्या एका गाडीने घटनास्थळी धाव घेत आग विझवली. यामध्ये सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. वडापावची गाडी मात्र जाळून खाक झाली, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजाराम व्हनमाने यांनी दिली.

Loading Comments