धारावीत इमारतीत आग, लाखो रुपयांची वित्तहानी


SHARES

धारावी - येथील 90 फूट रस्त्यालगत असलेल्या व्ही.ओ.सी. टॉवर इमारतीच्या चौथ्या मजल्यावर सोमवारी दुपारी अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत 409 क्रमांकाच्या खोलीतील लाखो रुपयांचे सामान जळून खाक झाले आहे. सुदैवाने घराला कुलूप असल्याने मोठी जिवीतहानी टळली. जर या घरातील सिलेंडरचा स्फोट झाला असता तर इमारतीचा चौथा माळा उध्वस्त झाला असता. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी असा अंदाज अग्निशमन दलाने वर्तवला आहे.

दुपारी अचानक आग लागल्यानंतर शेजाऱ्यांनी तात्काळ घराकडे धाव घेतली. परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. घराला बाहेरून कुलूप असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. त्यातच फ्रिजच्या कॉम्प्रेसरचा स्फोट झाल्याने रहिवाश्यांची एकच धावपळ सुरू झाली. जिन्यावर धुराचा लोळ पसरू लागल्याचे पाहताच इमारतीमधील रहिवाशांनी आपल्या चिमुरड्यांसह गच्चीवर तसेच तळमजल्याकडे धाव घेतली. 

तातडीने अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. मात्र इमारतीकडे जाण्याचा रस्ता अरुंद असल्याने तळ मजल्यावरील पाण्याच्या टाकीवर चढून अग्निशमन दलाच्या जवानांनी स्थानिक रहिवाशांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दलाच्या एका तुकडीने ऑक्सिजन सिलेंडर मास्क लावून इमारतीत प्रवेश केला.

तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. मात्र तोपर्यंत घरातील सर्व सामान जळून खाक झाले होते. घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक टी.एम.जगदीश यांनी शाखाप्रमुख जोसेफ कोळी आणि रवींद्र कोडम यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली आणि जोसुआ जॅकब कुटुंबियांची भेट घेतली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा