टाटा रुग्णालयाच्या बेसमेंटमध्ये आग


टाटा रुग्णालयाच्या बेसमेंटमध्ये आग
SHARES

परळ - जेरबाई वाडिया मार्गावरील टाटा मेमोरियल रुग्णालयाच्या बेसमेंटमध्ये शनिवारी सकाळी 9 च्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी बेसमेंटमध्ये साठवणूक करून ठेवण्यात आलेली महागडी औषधे जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.

टाटा रुग्णालयाच्या बेसमेंटमधून शनिवारी मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याने आग लागल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या आग नियंत्रक पथकाला कळविले. दरम्यान रुग्णालयाच्या आत सर्वत्र धूर पसरल्याने रुग्णालय परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. तर बेसमेंटलगत ऑक्सिजन टाकी, तसेच मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन सिलेंडर, औषधाचा साठा असल्याने रुग्णालय प्रशासनाने प्रसंगावधान राखत तत्काळ अग्निशमन दल आणि भोईवाडा पोलिसांना कळविले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत भोईवाडा पोलिसांकडून जेरबाई वाडिया मार्ग वाहनासाठी तात्पुरता बंद करण्यात आला. तब्बल तीन तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले.

'नेमकी आग कशामुळे लागली याचं कारण सांगता येणार नाही, मात्र बेसमेंटमधील औषधाच्या स्टोअर रूमला आग लागली होती. रुग्णालय आणि अग्निशमन दलाच्या परीक्षण तपासानंतर आगीबाबतचे निश्चित कारण कळू शकेल' असे अग्निशमन दलाचे विभागीय अधिकारी अशोक बनकर यांनी सांगितले.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा