कमिशनच्या वादात फॉरेस्ट ऑफिसरने काढलं रिवॉल्व्हर

Andheri, Mumbai  -  

अंधेरी - अंधेरीमध्ये फॉरेस्ट ऑफिसरनं शेजारीच राहणाऱ्या युवकाला बंदुकीच्या धाकाने जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप पीडिताने केला आहे. राकेश साळुंखे असं या ऑफिसरचं नाव असून, पीडित युवकाने या घटनेचा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट करुन पंतप्रधान कार्यालय आणि पोलिसांना टॅगही केलं आहे. 

राकेश साळुंखे हा फॉरेस्ट ऑफिसर पार्टटाईम एजंटचं काम करतो. फ्लॅट दाखवण्याच्या कारणावरुन त्यानं या तरुणाला मारहाण केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी राकेश साळुंखे यांच्याविरोधात डीएन नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

प्रदीप्ता संत्रा याने हा धमकी देणारा व्हिडिओ शूट केला असून, यामध्ये त्या अधिकाऱ्याची मुजोरी स्पष्ट दिसत आहे. तसेच हा अधिकारी शिवीगाळही करत असल्याचे व्हिडिओमध्ये ऐकू येत आहे. हा व्हिडिओ पीडिताने ट्विटरवर पोस्ट केला आणि मुंबई पोलीस, मुंबई पोलीस आयुक्त तसेच पंतप्रधान कार्यालयाला टॅग केलं आहे. तसेच आम्ही आमच्याच घरात बंदीस्त झाल्याचे त्याने ट्वीटमध्ये म्हटले आहे.

'माझ्या भाड्याच्या घराची मुदत संपली होती. त्यामुळे आम्ही नवीन घर शोधत होतो. त्यावेळी साळुंखे यांनी आम्हाला दोन घरं दाखवली. मात्र नंतर आम्ही जिथे राहत होतो तेच घर घेण्याचा निर्णय घेतला. याच रागातून साळुंखे याने धमकी द्यायला सुरुवात केली. त्याने आमच्याकडे 20 हजाराची मागणी केली. तसंच राहयचं असेल तर पैसे दे असं धमकावून बंदुकीचा धाक दाखवल्याचा आरोप तरुणाने केला आहे.

Loading Comments