म्हाडाचं घर देण्याच्या नावाने कोट्यवधींचा गंडा घालणारी टोळी अटकेत


म्हाडाचं घर देण्याच्या नावाने कोट्यवधींचा गंडा घालणारी टोळी अटकेत
SHARES

म्हाडाच्या अधिकाऱ्याचा बनाव करत साकीनाकातल्या अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या मुख्य आरोपीला चार दिवसांपूर्वी साकीनाका पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर मंगळवारी या प्रकरणी पोलिसांनी आणखी तीन आरोपींना अटक केली आहे. या टोळीने साकीनाकातल्या रहिवाशांना चार कोटींचा गंडा घातल्याचे चौकशीत उघड झाले आहे.

निजाम शेख (31) हा जोगेश्वरीत राहणारा असून तो या टोळीचा म्होरक्या आहे. पोलिसांनी निजाम शेखसह कुतुबुद्दीन मेहदपूरवाला (31), नौशाद कमाल खान (28) आणि अब्रार मोहम्मद युसूफ शेख (48) या आरोपींना अटक केली आहे.

साकीनाका येथील खैरानी रोड परिसरात राहणारे अब्दुल बारी खान या फिर्यादीच्या एका नातेवाईकाला 2012 साली निजाम शेख या आरोपीने दिव्यांग असल्याचा दाखला काढून दिला होता. यातूनच अब्दुल यांची आरोपी निजामशी ओळख झाली. त्यानंतर आरोपीने तो म्हाडामधून अपंग कोट्यातून अब्दुल यांना पवई विभागात घर घेऊन देण्याची बतावणी करत आपले अनेक अधिकारी आणि नेते मंडळींशी चांगले संबंध असल्याची बतावणी केली होती. त्यानंतर अब्दुल यांनी आरोपी निजामला 2013 साली दोन लाख रुपये घरासाठी दिले. त्यानंतर त्यांना म्हाडा कार्यालयातून बोलत असून त्यांचे कागदपत्र मिळाले असल्याचा फोन आल्याने आणि काम सुरू असल्याचे सांगितल्याने त्यांचा निजामवर विश्वास बसला. पुढे त्यांना आपल्या दोन भावांना देखील घर पाहिजे असून नहार अमृतशक्ती येथे दीड कोटी किंमत असलेली घरे अवघ्या वीस लाखाच्या आसपास मिळू शकतील या आमिषाने अब्दुल यांनी तब्बल पन्नास लाख रुपये निजामला दिले. यादरम्यान इतर तीन आरोपी हे त्यांच्या घरी म्हाडाचे अधिकारी असल्याची बतावणी करत वारंवार ये-जा करत होते. अशा प्रकारे या आरोपींनी या सर्वांना चार कोटींना चुना लावला होता. मात्र अनेक महिने उलटूनही घरे न मिळाल्याने अब्दुल यांनी म्हाडा कार्यालयात चौकशी केली असता हे सर्व प्रकरण बोगस असल्याचे त्यांच्या समोर आले. त्यानंतर त्याने याबाबत साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याअाधारे पोलिसांनी पहिल्यांदा निजामला अटक केली. त्यानंतर पोलिसांनी आणखी तीन आरोपींना अटक केली असून या आरोपींनी अशाप्रकारे अनेकाना गंडा घातला असावा असा संशय पोलिसांना आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा