SHARE

राज्यात घातपात घडवण्याच्या प्रयत्नात असलेल्या वैभव राऊत, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळकरच्या अटकेनंतर एटीएसनं रविवारी जालन्यातून चौथ्या आरोपीला अटक केली. श्रीकांत पांगरकर (४०) असं या आरोपीचं नाव आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येत श्रीकांतचा सहभाग अद्याप निश्चित झाला नसल्याचे एटीएसच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.


शरदच्या कॉल डिटेल्समधून नाव उघड

जालना शहरातील अंबड चौफुली भागात श्रीकांत आपल्या कुटुंबियासोबत राहतो. शरद कळसकर याच्या चौकशीतून त्याच्या वारंवार संपर्कात असलेल्या दोन जणांची नावे पुढे आली होती. त्यामध्ये डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येतील आरोपी सचिन अंधुरे याचे पहिले आणि दुसरे नाव श्रीकांत पांगरकर याचे होते. शरदच्या काँल डिटेल्समधून ही काही संशयित नंबर पुढे आले होते. त्यात ही श्रीकांतचा नंबर होता.


घातक शस्त्रास्त्रे जमविण्यात मदत

श्रीकांतने राज्यात घातपात घडवण्यासाठी घातक शस्त्रास्त्रे जमवण्यास मदत केल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र डॉ. दाभोळकर, आणि कॉ. पानसरे यांच्या हत्येच त्याचा अद्याप सहभाग निश्चित झाला नाही. पण श्रीकांतच्या चौकशीतून या प्रकरणात गुंतलेल्या अन्य आरोपींची नावं पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


पूर्वीचा शिवसेनेचा पदाधिकारी

श्रीकांत हा पूर्वी शिवसेनेचा पदाधिकारी होता. कालांतराने तो हिंदू जनजागृती करणाऱ्या संघटनांच्या कार्यक्रमात सहभागी होऊ लागला. त्यातून हे आरोपी एकत्र आल्याचे कळते. एटीएसकडून श्रीकांत पांगरकर याच्या घराची झडतीही घेण्यात आल्याचं सूत्राकडून कळतंय. झडतीत काय हाती लागलं, याचा तपशील अद्याप समजू शकलेला नाही. दरम्यान, श्रीकांतविरोधात एटीएसने घातपात घडवणे, घातक शस्त्रास्त्र बाळगणे, घातपाती कट रचणे या कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. श्रीकांतला सोमवारी न्यायालयात हजर केलं जाणार असल्याचं एटीएसच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं.


संबंधित विषय
ताज्या बातम्या