घर खरेदीच्या नावाखाली व्यावसायिकाला कोट्यावधी रुपयांचा गंडा

तक्रारदारास २०१८ पर्यंत काम पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले. एमओयूनुसार २०१८ मध्येही काम पूर्ण झाले नाही. याबाबत विचारणा केली असता विकासकाकडून सावला यांना टाळाटाळ केली जाऊ लागली.

घर खरेदीच्या नावाखाली व्यावसायिकाला कोट्यावधी रुपयांचा गंडा
SHARES

माटुंगा सारख्या उच्चभ्रूपरिसरात सुरू असलेल्या प्रकल्पात सदनिकांमध्ये गुंतवणूक केल्यास, १२ टक्के व्याज दराने चांगला परतावा देण्याच्या नावाखाली एका व्यावसायिकाची तब्बल १२कोटी रुपयांना फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी भोईवाडा पोलिस ठाण्यात दोन विकासक आणि चार कंपन्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचाः- सोशल मिडियावर हजारो फाॅलोअर्स असणारी ‘ती’ निघाली ‘तो’  पोलिसांकडून एकाला अटक

माटुंगा परिसरात राहणारे व्यावसायिक  बीपीन सावला याचा ट्रेडिंगचा व्यवसाय आहे. व्यवसायाच्या निमित्तातून २००१ मध्ये सावला त्यांची दोन विकासकांशी ओळख झाली होती. पुढे २०१३ मध्ये दोन्ही विकासकांनी  सावला यांना भांडुप आणि विक्रोळी परिसरात त्यांचे सुरू असलेल्या गृहनिर्माण प्रकल्पाविषयी माहिती दिली. या प्रकल्पातील सदनिकांमध्ये गुंतवणूक केल्यास १२ टक्के व्याज दराने चांगला परतावा मिळेल, असे आमीष आरोपींनी सावला यांना दाखवले. तसेच या प्रकल्पाचे काम चार नामकिंत कंपन्यामार्फत केले जात असल्याचे आरोपींनी सावला यांना सांगितले. त्यानुसार सावला यांनी गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली. तसेच पैसे देताना रितसर कागदपत्र बनवण्याबाबत आरोपींकडे विनंती केली होती. मात्र आरोपींनी अजून प्रकल्पाचे काम अर्धवट आहे. अनेक परवानगी येणे बाकी असल्याचे कारण देत, कागदपत्रे सर्व परवानगी मिळाल्यावर बनवू असे आश्वासन दिले. मात्र प्रकल्पासाठी पैसे कमी पडत असल्याचे कारण देत त्यांनी पैशांसाठी तगादा लावला. त्यानुसार  सावला यांनी ३ सदनिकांचे  व त्यांच्या नातेवाईकांनी ४ अशा सात सदनिका पार्किंगसह खरेदी करण्याचे ठरवले.

हेही वाचाः- अभिनेत्री रेखा यांचा कोरोना चाचणी करण्यास नकार

हे प्रकल्प २०१६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे आश्वासन सावला यांना देण्यात आले होते. वारंवार मागे लागून अखेर २०१५ मध्ये या व्यवहाराची नोंदणी करण्यात आली. त्यावेळी नऊ कोटी ८५ लाख रुपये तसेच एक कोटी रुपये नोंदणीचे संबंधीत व्यवसायिक व कंपन्यांच्या खात्यावर सावला व त्यांच्या नातेवाईकांनी वळते केले. त्यानंतर २०१६ मध्ये काम पूर्ण झाले नाही. त्यावेळी सावला यांना २०१८ पर्यंत काम पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले. एमओयूनुसार २०१८ मध्येही काम पूर्ण झाले नाही. याबाबत विचारणा केली असता विकसकाकडून सावला यांना टाळाटाळ केली जाऊ लागली. त्यानंतर नातेवाईकांकडूनही याबाबत सावला यांच्याकडे विचारणा होऊ लागल्यानंतर अखेर त्यांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार भोईवाडा पोलिस ठाण्यात दोन विकसक व चार कंपन्यांविरोधात १२ कोटी ५१ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र मालकी हक्काच्या सदनिका अधिनियमा अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत आर्थिक गुन्हे शाखा अधिक तपास करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

संबंधित विषय