'हनी ट्रॅप' लाऊन फसवणूक करणारं नायजेरियन जोडपं जेरबंद


'हनी ट्रॅप' लाऊन फसवणूक करणारं नायजेरियन जोडपं जेरबंद
SHARES

हनी ट्रॅप लाऊन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एका नायजेरियन जोडप्याला मुंबईच्या भांडुप पोलिसांनी जेरबंद केले आहे. न्नाग्बू ओरायजुका (39) आणि नेहारिका ओरायजुका (37) अशी या नवरा-बायकोची नावे असून हे दोघे फेसबुकवर सुंदर महिलांच्या नावे प्रोफाइल बनवून त्यात तरुणांना ओढून त्यांना लाखोंचा गंडा घालण्यात पटाईत होते.

न्नाग्बू ओरायजुकाने फेसबुकवर मर्सी जॉन नावाने एक अकाऊंट तयार केले होते, त्यावरून तो व्यापारी वर्गाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत असे. नंतर हे दोघे पती-पत्नीं अनेकांची फसवणूक करत राहिले. गेल्या ऑक्टोबर महिन्यात त्याने संदीप सिंग नावाच्या एका शेअर ट्रेडिंग करणाऱ्या व्यापऱ्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. या दोघांच्या कटकारस्थानांपासून अनभिज्ञ असलेल्या संदीप यांनी रिक्वेस्ट स्वीकारली. मर्सी जॉन असल्याचं भासवून न्नाग्बूच्या बायकोने संदीपशी बोलण्यास सुरुवात केली. आपण लंडनमधील एका फार्मास्युटिकल कंपनीत असल्याचं सांगत हर्बल सीडच्या व्यावसायत प्रचंड पैसे असल्याचं आमिष तिने संदीपला दाखवले.

पैसे दुप्पट होतील या लोभापाई संदीपने आधी अडीच लाख रुपये भरून हर्बल सीड भारतीय सप्लायरकडून विकत घेतले, विशेष म्हणजे हे सीड पाहण्यासाठी न्नाग्बू कंपनीचा मालक बनून भारतात आला आणि संदीपला भेटला देखील. त्यानंतर 50 हर्बल सीड पेकेटची आर्डर असल्याचं सांगून संदीप सिंहकडून सप्लायरच्या अकाऊंटमध्ये 10 लाख रुपये आरटीजीएसद्वारे दिलेल्या बँक खात्यात जमा केले. पैसे मिळताच मर्सी जॉन आणि भारतातील सप्लायर या दोघांचाही नंबर अचानक बंद झाला. त्यानंतर पैसे परत करण्याच्या नावाखाली पुन्हा एक लाख 26 हजारांची मागणी त्यांनी केली. आपले 12 लाख परत मिळतील या आशेपोटी संदीप यांनी पैसे भरले देखील, पण 12 लाख तर सोडा नंतर गुंतवलेल्या पैशांचा देखील पत्ता नव्हता. नंतर संदीप सिंह यांना संशय आला आणि त्यांनी भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार केली.

"हे नायजेरियन जोडपे दिल्लीवरून कारस्थानं करत असल्याचं कळताच भांडुप पोलिसांचं पथक दिल्लीला रवाना झालं. पण दिलेल्या पत्त्यावर हे जोडप सापडलं नाही. शेवटी गुड फ्रायडेचा मुहूर्त बघून दिल्लीतील एका चर्चेवर पाळत ठेवली आणि या दोघांना अटक केल्याची माहिती झोन 7 चे उपायुक्त सचिन पाटील यांनी दिली.

पोलिसांनी या दोघांकड़ून 14 मोबाइल, वेगवेगळ्या देशांचे सिमकार्ड, इंटरनेट डोंगल, मेमरिकार्ड, पेनड्राइव्ह, लॅपटॉप जप्त केले आहेत. या दोघांनी आणखी काही लोकांना फसवल्याची शक्यता नाकारता येत नाही.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा