डोळ्यात मिरचीची पूड टाकून मित्राच्या आईला लुबाडले

  Bandra west
  डोळ्यात मिरचीची पूड टाकून मित्राच्या आईला लुबाडले
  मुंबई  -  

  मनालीला फिरायला गेलेल्या मित्राच्या घरात घुसून त्याच्या वृद्ध आईच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून लुबाडल्याची घटना वांद्रे परिसरात घडली. या प्रकरणी गुन्हे शाखा कक्ष 9 ने समीर मौला अली (32) आणि त्याचा साथीदार इस्माईल नवाझ शेख (30) या दोघा आरोपींना अवघ्या काही तासांत अटक केली आहे.

  लीलावती रुग्णालयाजवळ राहणाऱ्या नाजरीन मर्चंट नावाच्या 60 वर्षीय महिला त्यांचा मुलगा आझीम मनाली येथे फिरायला गेल्याने घरी एकट्याच होत्या. त्यावेळी अचानक एक इसम त्यांचा घरी आला आणि 'आझीमने पार्सल देने के लिए भेजा है', असे त्यांना सांगू लागला. मुलाचे नाव घेतल्याने नाजरीन यांचा त्याच्यावर विश्वास बसला. त्यांनी त्या इसमाला घरात घेतले.

  मात्र घरात येताच त्याचा खरा चेहरा समोर आला.किचनमधील चाकू उचलून त्याने नाजरीन यांच्या गळ्यावर ठेवला. अचानक घडलेल्या या घटनेने दम्याचा त्रास असलेल्या नाजरीन यांना दम लागू लागला. पण या नराधमाला त्याची फिकिर नव्हती. त्याने नाजरीन यांच्याकडून बळजबरीने कपाटाच्या चाव्या घेतल्या आणि त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून सव्वा पाच लाखांचे दागिने तसेच रोकड घेऊन पसार झाला.

  याप्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आली. आरोपीने ज्यावरून वृद्ध महिलेच्या मुलाचे नाव घेतले, त्यावरून तो त्यांच्या परिचयातीलच असावा, असा पोलिसांचा संशय बळावला. गुन्हे शाखेने तात्काळ तपासची चक्रे फिरवून नाजरीन यांच्या घरी दरोडा घालणारा इस्माईल शेख आणि त्याचा साथीसार समीर मौला अलीला अटक केली.

  समीर हा नाजरीन यांचा मुलगा अझीमचा मित्र असून त्याला अझीम मनालीला असल्याचे माहित होते. त्यातूनच त्याने आपल्या मित्राच्या मदतीने अझीमच्या घरी दरोडा टाकण्याचा बेत आखला. हे दोघेही चोरीचा माल अर्धा अर्धा वाटून घेणार होते. पोलिसांनी दोघांकडून सव्वा पाच लाख रुपयांचे दागिने हस्तगत केले आहेत.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.