Advertisement

गणेशोत्सव २०१९: बेशिस्त वाहनचालकांमुळे लालबाग परिसरात वाहतूककोंडी

गणेश दर्शनासाठी येणारे काही बेशिस्त वाहनचालक पार्किंगचे नियम धाब्यावर बसवून रस्त्यावर वाहनं उभी करत आहेत. यामुळे लालबाग, भायखळा परिसरात वाहतूककोंडीत रस्ते हरवले आहेत.

गणेशोत्सव २०१९: बेशिस्त वाहनचालकांमुळे लालबाग परिसरात वाहतूककोंडी
SHARES

मुंबईतील पावसाचा जाेर ओसरल्यापासून लालबाग, परळ भागात गणेशदर्शनासाठी भाविकांची पुन्हा गर्दी होऊ लागली आहे.  मुसळधार पावसातही काही भाविक दर्शनाच्या प्रतीक्षेत उभे राहत आहेत. तर दुसरीकडे दर्शनासाठी येणारे काही बेशिस्त वाहनचालक पार्किंगचे नियम धाब्यावर बसवून रस्त्यावर वाहनं उभी करत आहेत. यामुळे लालबाग, भायखळा परिसरात वाहतूककोंडीत रस्ते हरवले आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांचा ताप वाढला आहे.

भर पावसात रांगेत

‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी येणारे भाविक भर पावसातही लांब रांगेत उभे रहात आहेत. बुधवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे लालबाग परिसरातील सखल भागात अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. तरीही भाविक लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी पाण्यातून वाट काढत रांगेतून पुढं  सरकत होते.

२० ते २५ मिनिटे

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी होणाऱ्या भाविकांच्या  गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी १२०० हून अधिक पोलिस तैनात करण्यात आले आहेत. मात्र दर्शनाकरता भाविकांची झुंबड उडत असल्याने रस्त्यावर वाहतूककोंडी होत आहे. त्यातच दर्शन घेऊन आलेल्या भाविकांसाठी टॅक्सीवालेही रस्त्यातच गाडी थांबवत आहेत. त्यामुळे भारतमाता चित्रपटगृहापासून लालबागच्या चित्रपटगृहापर्यंत जाण्यासाठी वाहनधारकांना २० ते २५ मिनिटे लागत आहेत.

नियमांचं उल्लंघन

बेशिस्तपणे पार्किंग करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करण्यासाठी भायखळा व सुपारी बाग वाहतूक नियंत्रण कक्षाकडून मोहीम सुरू करण्यात आली आहे. लालबाग परिसरात अनेक प्रसिद्ध गणपती असल्यामुळे संपूर्ण मुंबईतून येथे भाविक दर्शनासाठी येतात. अनेक जण वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून जागा मिळेल त्या ठिकाणी वाहने उभी करतात. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो, असं पोलिसांचं म्हणणं आहे.

कारवाई सुरूच

भायखळा वाहतूक विभागाकडून दिवसाला १०० ते १५० दुचाकी व ३५ ते ४० चारचाकी वाहनांवर कारवाई केली जाते. तसंच सुपारीबाग विभागातून दिवसाला ८० ते १२० दुचाकी व २० ते २५ चारचाकी गाड्यांवर कारवाई केली जात असल्याचं वाहतूक विभागाच्या कार्यालयातून सांगण्यात आलं.हेही वाचा-

गणेशोत्सव २०१९: चिंचपोकळीचा चिंतामणी

१० मिनिटांत लालबागच्या राजाचं दर्शन, पावसामुळे गणेशभक्तांची गर्दी ओसरलीसंबंधित विषय
Advertisement