फहिमची 'अशी'ही 'मचमच', 'डी गॅंग'च्या नावाने तीन व्यावसायिकांना धमक्या

वांद्रे खंडणी प्रकरणात कुख्यात गुंड दाऊद आणि छोटा शकिलचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कोणताही संबध अद्याप आढळला नसून या दोघांच्या नावाने फहिम मचमच त्यांना धमकावत असल्याचं तपासात पुढे आलं आहे.

फहिमची 'अशी'ही 'मचमच', 'डी गॅंग'च्या नावाने तीन व्यावसायिकांना धमक्या
SHARES

वांद्र्यातील सामाजिक कार्यकर्त्या महिलेसह शहरातील तीन बडे व्यावसायिक ‘डी गँग’च्या रडारवर आहेत. अशी धक्कादायक कबुली मुंबईच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केलेल्या शार्प शूटर जगबीर सिंगने देताच एकच खळबळ उडाली. मात्र या गुन्ह्यात कुख्यात गुंड दाऊद आणि छोटा शकिलचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कोणताही संबध अद्याप आढळला नसून या दोघांच्या नावाने फहिम मचमच त्यांना धमकावत असल्याचं तपासात पुढे आलं आहे.


काय आहे प्रकरण?

वांद्रे परिसरात एका नामांकित संस्थेच्या संचालिका असलेल्या महिलेला नोव्हेंबर महिन्यात तीन खंडणीचे फोन आले. यातील दोन फोन हे पाकिस्तानमधून उस्मान चौधरीने केले होते. तर एक फोन दिल्लीतून हरीष यादवने केला होता. त्यानुसार पोलिसांनी हरीषला अटक केली. हरीषच्या अटकेनंतर या प्रकरणात नवनवीन खुलासे होऊ लागले. हरीषने आपण सराईत गुन्हेगार ललित शर्मा आणि बिलाल कुतुबऊद्धीनच्या सांगण्यावरून धमकी दिल्याचं सांगितलं. त्यानुसार पोलिसांनी वांद्रे येथून बिलालला अटक केली. बिलालच्या चौकशीतून शार्पशूटर जगबीर आणि मुख्य सूत्रधार फहिम मचमच, उस्मान चौधरी, दाऊद इब्राहिम आणि छोटा शकिल यांची नावे पुढे आली.


कोण आहे फहिम मचमच?

भारतात दाऊद आणि छोटा शकिलच्या नावावर फहिम मचमच अनेकांना धमकावत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं आहे. बिलालने दिलेल्या माहितीनुसार फहिमने भारतात शार्प शूटरची टोळी बनवली आहे. त्यामध्ये यूपी, रत्नागिरी, मध्यप्रदेश, कुर्ला, साकीनाका, पंजाब आणि इतर ठिकाणचे अशा ७ शार्प शूटरचा समावेश आहे. त्याची निवड फहिमने फेसबुकहून तर काहींची जुन्या गुन्ह्यातील सहभागातून केली आहे.

जगबीरला फहिमने फेसबुकवरून शोधून काढलं होतं. जगबीरने हत्येची सुपारी घेतल्यानंतर तो अॅन्टाॅप हिल येथील गुरूद्वारमध्ये रहात होता. त्या ठिकाणी त्याची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था मोफत होत होती. हत्येसाठी फहिम त्याला हत्यार देणार होता. फेसबुकवरूनच त्याने सामाजिक कार्यकर्ता महिलेच्या घराचे आणि कारचे फोटो दिले होते. फहिम आणि जगबीरमधील हे चॅट पोलिसांनी मिळवलं असून कलिनाच्या फाॅरेन्सिक लॅबमध्ये ते तपासणीसाठी पाठवलं आहे.


तीन व्यावसायिक रडारवर

बिलाल आणि शार्प शूटर जगबीरने दिलेल्या माहितीनुसार फहिमने वांद्र्यातील सामाजिक कार्यकर्ता महिलेसोबतच पवईतील दोन मोठे व्यावसायिक आणि वांद्र्यातील एका आॅनलाईन गेमच्या डायरेक्टरची देखील सुपारी घेतली होती. इतर शूटर मुंबईतले काम घेत नसल्यामुळे फहिमने जगबीरलाच इतर तीन व्यावसायिकांची माहिती गोळा करण्यास सांगितली होती. त्यानुसार इतर व्यावसायिकांना देखील पैशांसाठी या टोळीने धमकावल्याचं कळत आहे. त्यानुसार पोलिस धमकावण्यात आलेल्या व्यावसायिकांचे जबाब नोंदवून घेत असून यासंबधी अधिक तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.


भारताचा दाऊद, तर पाकिस्तानचा राजासाब

भारतात अनेक महत्वाच्या गुन्ह्यात पोलिसांना कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम हवा आहे. भारतात दाऊद इब्राहिमला ‘डाँन’, ‘भाई’ ‘बडेभाईजान’ या नावाने ओळखलं जातं. मात्र पाकिस्तानमध्ये त्याच्याकडे एक व्यावसायिक म्हणून पाहिलं जातं. तसंच वयोवृद्ध दाऊदला राजासाब म्हणून अोळखलं जात असल्याचं या पूर्वीही पोलिसांच्या निदर्शनास आलं आहे. या गुन्ह्यात देखील उस्मानने फहिमला राजासाब (दाऊद)ने हे काम दिल्याचं म्हटलं जातं आहे. मात्र यासंबंधी अजून ठोस पुरावे हाती नसल्याने सध्या तरी पोलिस फहिम दाऊद आणि छोटा शकिलच्या नावावर ही टोळी चालवत असल्याचं सांगत आहेत.



हेही वाचा-

मुंबईत खंडणीप्रकरणात दाऊद इब्राहिम, छोटा शकीलचा हात

'इसिस'च्या टार्गेटवर रेल्वे, कुठलंही हत्यार न वापरता घातपात घडवण्याची योजना


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा