SHARE

कुख्यात गुंड रवी पुजारीने चेंबूरमधील एका प्रसिद्ध डाॅक्टरला खंडणीसाठी धमकावल्याचा प्रकार पुढे आला आहे. पुजारीने या डाॅक्टरकडे पाच कोटी रुपयांची मागणी केली असून पैसे न दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली आहे, असं डाॅक्टरने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. याप्रकरणी चेंबूर पोलिस ठाण्यात डाॅक्टरने तक्रार नोंदवली असून खंडणी विरोधी पथकाचे पोलिस अधिक तपास करत आहेत.


पाच लाखांच्या खंडणीची मागणी

मुंबईतल्या सराईत गुंडांची पाळंमूळं नष्ट करण्यात खंडणी विरोधी पथकाला यश आल्यानंतर अस्तित्व राखून ठेवण्यासाठी कुख्यात गुंडांनी छोट्या-मोठ्या गुंडांचा आधार घेण्यास सुरुवात केली आहे. ऐकेकाळी बाॅलिवूड, व्यावसायिक, विकासक यांच्याकडे फोन करून खंडणी मागणाऱ्या गुंडांनी आता आपला मोर्चा वैद्यकिय क्षेत्रात असलेल्या बड्या हस्तींकडे वळवला आहे.

याचं कारण की, नोटबंदीनंतर अनेक व्यावसायिकांचे मोठे नुकसान झालं. तर बड्या विकासकांवर अनेक निर्बंध लावल्यामुळे त्यांचा व्यवसायही बसलेला आहे. त्यामुळेच या गुंडांनी वैद्यकिय क्षेत्राला लक्ष केलं आहे.

अशातूनच रवी पुजारीकडून चेंबूरच्या एका डाॅक्टरला धमकावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी हा गुन्हा खंडणी विरोधी पथकाकडे वर्ग केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुठल्यातरी छुटपूट व्यक्तीने रवी पुजारीच्या नावाने धमकी दिल्याचा पोलिसांना संशय आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या