गँगस्टर रवी पुजारीकडून रेमो डिसोझाला खंडणीसाठी धमकी

फायनान्सर सत्येंद्र त्यागी(36) याच्या सांगण्यावरून रवी पुजारीने हा दूरध्वनी केल्याचा आरोप असून याप्रकरणी त्यागीला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने मंगळवारी अटक केली आहे.

गँगस्टर रवी पुजारीकडून रेमो डिसोझाला खंडणीसाठी धमकी
SHARES

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक व नृत्यदिग्दर्शक रेमो डिसोझाला एका चित्रपटातील व्यवहारातून उद्भवलेल्या वादातून गँगस्टर रवी पुजारीकडून खंडणीसाठी धमकी देण्यात आली आहे. फायनान्सर सत्येंद्र त्यागी(36) याच्या सांगण्यावरून रवी पुजारीने हा दूरध्वनी केल्याचा आरोप असून याप्रकरणी त्यागीला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने मंगळवारी अटक केली आहे. मात्र या प्रकरणामुळे बॉलिवूड व अंडरवर्ल्ड या दोघांमधील कनेक्शन पुन्हा समोर आले आहे.


डेथ ऑफ अमर चित्रपटावरून वाद

दिग्दर्शक रेमो डिसोझा व त्यागी एकत्र येऊन 'डेथ ऑफ अमर' हा चित्रपट बनवत होते. राजीव खंडेलवाल हा या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार होता. या चित्रपटाचे काम आर्थिक व्यवहारातून झालेल्या वादामुळे अडकले. त्यागीने पाच कोटी रुपये या चित्रपटात गुंतवले होते. पण डिसोझाकडून त्याबाबत ना हरकत प्रमाणपत्र त्यागीला मिळत नसल्यामुळे दोघांमध्ये वाद सुरू झाला. त्यातून गँगस्टर रवी पुजारीने डिसोझाला धमकी देऊन ही रक्कम त्यागीला परत करण्यास सांगितले.


रेमोच्या पत्नीलाही धमकीचे फोन

या प्रकरणात दोघांनीही एकमेकांवर फसवणुकीचे आरोप केले होते. दरम्यान, याप्रकरणी गँगस्टर रवी पुजारीने दूरध्वनी करून त्यागीला पाच कोटी रुपये परत करण्याची धमकी दिली होती. तसेच 'त्यागीला ना हरकत प्रमाणपत्र दे आणि मला ५० लाख रुपये दे', अशी मागणीही पुजारीने यावेळी केली होती. रेमोने त्याला टाळण्यास सुरूवात केल्यानंतर रेमोची पत्नी लिझेल डिसोझा हिलाही धमकीचे दूरध्वनी आले.


ऑगस्टपासून जानेवारीपर्यंत आले फोन

लिझेल डिसोझाच्या तक्रारीवरून याप्रकरणी भादंवि कलम 385, 387 व 34 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर याप्रकरणी मंगळवारी गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने सत्येंद्र त्यागीला अटक केली. ऑगस्टपासून जानेवारीपर्यंत हे धमकीचे दूरध्वनी आल्याचे सूत्रांनी सांगितले.


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा