पगार न देणाऱ्या मालकावर चाकूहल्ला

  Andheri
  पगार न देणाऱ्या मालकावर चाकूहल्ला
  मुंबई  -  

  दोन महिन्यांचा पगार दिला नाही म्हणून एका कर्मचाऱ्याने रागाच्या भरात आपल्या मालकावर चाकूने वार केल्याची घटना अंधेरीत घडली आहे. या कर्मचाऱ्याला घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसाने जागेवरच पकडून गजाआड केले. 

  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंधेरीतील लक्ष्मी इंडस्ट्रियल इस्टेटच्या गाळा क्रमांक 7/ जे मध्ये तुषार पटवा (60) यांच्या मालकीचे गारमेंट होते. या गारमेंटमध्ये अशोक श्रीवास्तव नावाचा कर्मचारी मागील चार वर्षांपासून कामाला होता. पण एप्रिल 2017 मध्ये हे गारमेंट बंद करण्यात आले. गारमेंट बंद झाले त्यावेळी अशोक याचा दोन महिन्यांचा पगार बाकी होता. त्यामुळे तो पटवा यांच्याकडे पगार मागण्यासाठी नेहमी येत असे. 

  त्यानुसार 7 जूनला दुपारी 12 वाजता तो पुन्हा पटवा यांच्याकडे आला. यावेळी त्याच्या हातात चाकू देखील होता. त्याने पटवा यांच्याकडे पैसै मागितले. मात्र पटवा त्याला काही उत्तर देणार एवढ्यातच अशोकने त्यांच्यावर चाकूने वार केले. त्यावेळी तुषार यांना वाचवण्यासाठी आलेल्या त्यांच्या पत्नी रुपालीवरही त्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. 

  या गडबडीचा आवाज ऐकून जवळच असलेले पोलीस हवालदार संतोष चन्नपा तेथे पोहोचले. त्यांनी प्रसंगावधान दाखवत पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या अशोकला मागून पकडले. अंधेरी पोलिसांनी अशोकवर भादंवि कलम 307,506(2), 37(1) (2) अंतर्गत गुन्हा दाखल करत न्यायालयात हजर केले असता त्याला 12 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.